सूर्य उगवायच्या आत बाजी स्नान-पूजा आटोपून सदरेवर आले होते. सदरेवर राजांच्यासाठी खास बैठक आच्छादली होती.
गडाच्या प्रत्येक घरासमोर शेणसड्यावर रांगोळ्या घातल्या होत्या. गडाच्या प्रवेशद्वारावर आंब्यांच्या पानांची तोरणं लटकली होती. सणासुदीचे कपडे घालून सारे राजांची प्रतीक्षा करीत होते.
राजे सकाळी येणार, अशी वर्दी आली होती. बाजी राजांच्या स्वागतासाठी जायला निघाले. त्यांच्या संगती फुलाजी, यशवंता, तात्याबा होते.
सर्व सूचना देऊन बाजी गडाखाली उतरले.
दूरवरून टापांचा आवाज येऊ लागला आणि बाजींच्यासह सर्वजण त्या आवाजाच्या दिशेनं पाहत उभे राहिले.
हिरव्या गर्द राईतून धुळीचे लोट उसळत होते. टापांचा आवाज मोठा होत असता, झाडीतून दौडत येणारं अश्वदल साऱ्यांच्या नजरेत आलं. राजे गडाच्या पायथ्याशी येताच बाजींनी त्यांचं स्वागत केलं. राजांचं लक्ष सामोऱ्या दिसणाऱ्या गडावर खिळलं होतं. नकळत ते उद्गारले,
‘सुरेख’
‘चलावं!’ बाजी म्हणाले.
राजांच्या बरोबर तानाजी, येसाजी, नेताजी ही राजांची खास माणसं होती. चालता-चालता राजे म्हणाले,
‘बाजी! तुमच्या तात्याबानं आणि यशवंतानं सारं सांगितलं आहे. आता फक्त गड पाहायचं तेवढं उरलं आहे.’
शिवाजीराजे गडाच्या प्रथम दरवाज्याशी येताच नगारखान्यातून नौबत झडली. राजांचं लक्ष नगारखाना व त्यावर फडकणाऱ्या भगव्या झेंड्याकडं गेलं. दरवाज्याशी पाच सुवासिनींनी राजांना ओवाळलं. हुरमंजीच्या रंगानं तांबडाबुंद झालेला खिळेबंद दरवाजा राजे कौतुकानं पाहत होते. न राहवून ते बोलले,
‘इथले सुतार कसबी दिसतात!’
‘गुणी मानसांना इथं तोटा नाही. फक्त गुणांची पारख करणारा, त्या गुणाचं चीज करणारा हवा.’ बाजींनी अभिमानानं सांगितलं.
‘छान बोललात! बाजी छान बोललात!’ राजे म्हणाले, ‘तसं झालं, तर या मुलखासारखा मूलूख नाही. त्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. तुम्ही इकडे रोहिडा, जासलोड गडाची बांधणी करीत असता आम्ही स्वस्थ बसलो नव्हतो. तोरणा, कोंढाण्याची डागडुजी आणि प्रतापगडाची उभारणी आम्ही केली.’
‘प्रतापगड?’ बाजींनी विचारलं.
‘जावळीच्या निबिड रानात एक बुलंद डोंगर उभा होता. त्या डोंगराचा आम्ही प्रतापगड बनवला.’
राजे बोलत असता विठोजी, गुणाजी पुढं झाले. राजांना त्यांनी मुजरे केले.
‘काय, किल्लेदार! झालं ना मनासारखं?’ राजे कौतुकानं म्हणाले. त्यांचं लक्ष कुबडी घेऊन उभा असलेल्या गुणाजीकडं गेलं.
‘गुणाजी, तुम्ही इथं?’
‘राजे, गुणाजी आणि विठोजी व्याही आहेत.’
‘आम्हांला समजलं नाही.’
‘आपले गुणाजीचे यशवंतराव, विठोजीचे जावई आहेत.’
‘अरे, व्वा! चांगलीच बांधिलकी केली. आता तर हा गड आम्हाला मुळीच परका नाही.’
शिवाजी राजे सर्वांच्या संगती गडात प्रवेश करीत होते.
गडाच्या परिसरात उभारलेल्या वास्तू ते निरखीत होते. ते गडाचे बदललेलं रूप पाहत असता गडाची पूर्वस्थिती आठवीत होते.
राजे प्रथम देवीच्या देवळात गेले. देवीचं दर्शन घेऊन राजे बाहेर आले. बाजी राजांना घेऊन सदरेकडं गेले. सदरेचा थाट त्यांनी पाहिला आणि राजांनी आपला निर्णय जाहीर केला,
‘आम्ही येथे राहणार नाही.’
‘जी!’ विठोजी उद्गारले.
‘विठोजी, साऱ्यांशी नातं बांधलंत. मग आम्हांलाच का वगळताय्? आम्ही तुमच्या वाड्यात वास्तव्य केलं, तर चालेल ना?’
‘काय इचारता! तुमच्या पावलानं माझी कुळी धन्य व्हईल.’
राजांच्या त्या निर्णयानं एकच धावपळ उडाली. राजसदरेवरची बिछायत विठोजीच्या वाड्यात नेली गेली.
राजे गड पाहून प्रसन्न झाले होते. ते बाजींना म्हणाले,
‘बाजी! कल्पनेपेक्षाही सुरेख गड उभारलात.’
‘आज्ञा!’ बाजी म्हणाले.
‘आज्ञा करणं सोपं आसतं! पण त्या साकार करणं कठीण असतं. बाजी, आता या पुढं या गडाला जासलोड नाव शोभणार नाही. या गडाचं नाव मोहनगड ठेवा.’
राजे सर्वांशी बोलत विठोजीच्या वाड्याकडं आले. राजांच्यासाठी बैठक हंतरण्याची धावपळ चालू होती. राजांच्या ते ध्यानी आलं.
‘विठोजी, आम्ही तुमचे पाहुणे म्हणून आलो नाही. आम्हांला तुम्ही घरचे समजा. आमच्यासाठी तुम्ही धावपळ करू नका. आपल्या घरची मीठ-भाकर आम्ही गोड मानून घेऊ.’
राजे वाड्यात आले आणि सखू बाहेर आली. तिनं राजांना वाकून नमस्कार केला. विठोजी म्हणाले,
‘ही माझी लेक, सखू.’
पदर सावरून उभ्या राहिलेल्या सखूकडं पाहत राजे उद्गारले,
‘सखू, सखूबाई…’
क्षणभर राजांना मृत्यू पावलेल्या सईंबाई राणीसाहेबांची आठवण झाली. डोळ्यांच्या पापण्या ओलावल्या, पण क्षणभरच. स्वतःला सावरत राजे म्हणाले,
‘विठोजी! हिला पाहून आमच्या सखूची आम्हांला आठवण झाली. आमच्या सखूबाई हिच्यासारख्याच आहेत. मुलगी भेटल्याचा आनंद झाला.’ आणि सखूकडं वळून ते म्हणाले, ‘पोरी! आम्ही दोन दिवस येथे आहोत. आम्ही आलो, म्हणून पक्वान्नं करू नको. आम्हांला ती चालत नाहीत. झुणाका, भाकर, भाजी आम्हांला आवडते.’
‘व्हय, जी!’ सखू म्हणाली.
‘जे पोरांना कळतं, ते मोठ्यांना समजत नाही. खरं ना, विठोजी!’ राजांनी विचारलं.
विठोजीला काही कळलं नाही. तो राजांच्याकडं पाहत होता, मागं उभे असलेले नेताजी, तानाजी, बाजी का हसले, हेही त्याला समजलं नाही.
दुसरे दिवशी राजे गडाची पाहणी करण्यासाठी बाहेर पडण्याच्या तयारीत असता सखू आतून बाहेर आली.
‘बाहेर जाऊ नका. आईनं आंबील केली हाय. ती घेऊन मगच जायचं तिथं जावा.’
राजे कौतुकानं सखूकडं पाहत होते. सोप्यावरचे सारे सखूचे ते बोल ऐकून बघत राहिले. विठोजी उसळला.
‘पोरी! कुनाला सांगतीयास हे? काय रीत-भात हाय, का न्हाई?’
त्या बोलण्यानं सखू शरमली. राजे हसले. ते म्हणाले,
‘विठोजी, तिला बोलू नका. आमची सखू आमच्यावर असाच अधिकार गाजवते. तिच्या बोलण्याचं आम्हांला सुख आहे. ते आम्हांला भोगू द्या. सखू! घेऊन ये तुझी आंबील. ती घेऊनच आम्ही बाहेर जाऊ.’
सखू आंबीलाचा कटोरा घेऊन बाहेर आली. राजांनी सर्वांच्या देखत आंबील संपवली. सर्वांकडं पाहत राजांनी सखूला विचारलं,
‘आम्ही एकट्यानंच आंबील घ्यायची?’
‘एकट्यानं का?’ सखू म्हणाली, ‘येरवाळीच साऱ्यांस्नी आंबील दिलीय्.’
तानाजी म्हणाला,
‘महाराज! या घरचा पावनेर लई मोठा हाय.’
विठोजी म्हणाला,
‘पावनेर कसला! दोन वेळा जेवायची मारामार होती. तुमच्या पावलानं गडावर लक्षुमी आली. मला वाटाय काय जातय्?’
‘विठोजी! आता तुम्ही गडाचे गडकरी. देवानं दिलं, ते असचं सढळ हातानं गोरगरिबांना वाटा. लक्षमी कधी तुमच्यावर रुसायची नाही. चला, गड बघू.’
राजांच्या संगती सारे बाहेर पडले.
राजांनी पाण्याचं टाकं बघितलं. साऱ्या वास्तू पाहत राजे फिरत होते. नव्या उभारलेल्या बुरूजांचं कौतुक राजे करीत होते.
फिरत असता गडाच्या एका तटावर उभा असलेल्या बुरूजाकडं राजांचं लक्ष गेलं. तो बुरूज तसाच जुनाट वाटत होता. त्याचे दगड अनेक ठिकाणी कोसळले होते. राजांनी त्या बुरूजाकडं बोट दाखवत बाजींना विचारलं,
‘बाजी! तो बुरूज तसा का?’
‘राजे! त्या बुरूजाला वेताळाचा बुरूज म्हणतात. ती जागा बाधक आहे. पण बुरूजाची जागा सुरक्षित आहे.’ बाजी म्हणाले.
‘अस्सं!’ राजे त्या बुरूजाच्या दिशेनं जात होते.
बाजींनी सांगितलं, त्यात काही खोटं नव्हतं. बुरूजाखाली सरळ उतरलेला कडा डोळे फिरवत होता.
राजे शांतपणे वळले. त्यांनी बाजींना आज्ञा केली,
‘बाजी, या बुरूजाला खणती लावा.’
‘खणती!’ विठोजीचे डोळे विस्फारले. तो आश्चर्यानं म्हणाला, ‘राजं! तसं करू नगा! पाया पडतो तुमच्या. दर आवसेला आनि पुनवेला नारळ फोडून दिवा लावतो. चुकून राहिलं, तर राती मशाल फिरताना दिसतीया. वराडनं ऐकू येतंया.’
‘अस्सं! म्हणजे जागृत वेताळ आहे, तर!’ राजे उद्गारले, ‘बाजी, आता ह्या गडाचं जासलोड गड नाव राहिलं नाही. या मोहनगडावर यापुढं वेताळाची सत्ता राहाणार नाही. बाजी, या बुरूजाला खाणती लावा.’
साऱ्यांच्या चेहऱ्यांवर भीती उमटली होती. त्या वेताळ बुरूजाच्या भीतीनं भर दिवसा देखील कोणी माणसं फिरकत नव्हती. राजांच्या बोलण्यानं भीतिग्रस्त झालेली सारी अचंब्यानं उभी असता, राजांचे बोल साऱ्यांच्या कानावर पडले,
‘विठोजी, काल तुमच्या वाड्यात आम्ही निद्राधीन झालो असता आम्हांला देवीचा दृष्टान्त झाला.’
‘देवी!’
‘हो, जगदंबा! तिनं आम्हांला हा बुरूज दाखवला. त्यात धन आहे, असं सांगितलं.’
राजांच्या बोलण्यावर कुणाचा विश्वास बसत नव्हता. कोणी खणती लावायला पुढं धजत नव्हतं.
राजांच्या ध्यानी सारी परिस्थिती आली. ते नेताजींना आज्ञा करते झाले,
नेताजी, आपले मावळे बोलवा. येताना खणतीची अवजारं आणायला सांगा.’
नेताजी तातडीनं गेले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित होतं. पण बाकी सर्वांच्या मुद्रा गंभीर होत्या. राजे विठोजींना म्हणाले,
‘एकंदरीत तुमचा वेताळ बुरूज जागता दिसतो.’
‘व्हय, राजे!’ विठोजी आशेनं म्हणाला, ‘आजवर लई जनांस्नी बाधा झालीया. खोटं सांगत न्हाई. पन भर उनाचंबी कोना मानसाची या जागंत पाय ठेवायची टाप न्हाई.’
‘अस्सं!’ राजांच्या चेहऱ्यावर तेच स्मित होतं. ‘विठोजी, तुम्ही रात्रीच्या वेळी कधी मशाली बघितल्यात?’
विठोजीनं नकारार्थी मान हलवली.
‘कधी किंकाळ्या, ओरडणं ऐकलंत?’
विठोजी नकारार्थी मान हलवत म्हणाला,
‘म्या ऐकलं न्हाई, पन लई ऐकलंय्.’
‘काय ऐकलंत?
‘जवा का गड बांधला, तवा ह्या तटावर बुरूज उभा ऱ्हाईना. तवा आमदानी निजामशाहीची व्हती. बुरूज उभा ऱ्हाईना, म्हणून एका बाळंतणीला पोरासकट या बुरूजात गाडली. बुरूज उभा ऱ्हायला. ती बाळंतीन अजून बी राखन करतीया.’
‘अस्सं!’ राजे म्हणाले, ‘एकंदरीत बराच जागृत बुरूज दिसतो हा. मग आम्हांला देवीनं दृष्टान्त का दिला?’
तोवर राजांचे मावळे आले होते. पहारी, कुदळी त्यांच्या हातात होत्या. राजांनी बुरूजाकडं बोट दाखवलं. आज्ञा केली,
‘त्या बुरूजाला खणती लावा.’
बुरूजाचे दगड ढासळत होते.
राजे शांतपणे ते दृश्य पाहत होते.
पाच-पंचवीस मावळ्यांनी बुरूजाला हात घातला होता. पहार, कुदळ आणि कोसळणारे दगड यांचे आवाज सोडले, तर दुसरा आवाज उमटत नव्हता.
बुरूज निम्मा ढासळला आणि एका पहारीच्या रूतण्यात खणकन आवाज उमटला. साऱ्यांच्या मुद्रा बदलल्या. उत्सुकता वाढली. काळजीपूर्वक माती, दगड काढले जात होते आणि काही वेळानं खणती करणाऱ्यांना आतली भांडी दिसू लागली. लहान हंड्याच्या आकाराची मोहोरबंद केलेली दोन भांडी बाहेर काढण्यात आली.
भांडी वजनदार होती. राजांच्या समोर ती भांडी आणली गेली. साऱ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
राजांनी शांतपणे आज्ञा दिली,
‘उघडा!’
दोन्ही भांड्यांची शिशाची कडी फोडली गेली. भांड्यांची तोंडं उघडली. भान विसरून विठोजी उद्गारला,
‘मोहरा!’
सारे राजांच्याकडं कौतुकानं पाहत होते.
राजे विठोजीला म्हणाले,
‘काय, विठोजी! आमचा दृष्टान्त खरा ठरला ना!’
‘व्हय, राजं! देवी खरचं तुमच्यावर परसन् हाय, बघा.’
बाजी आश्चर्यानं तो सारा प्रकार पाहत होते. काय बोलावं, हे त्यांना सुचत नव्हतं.
राजांनी सांगितलं,
‘हे हंडे सदरेकडं घेऊन चला.’ आणि बाजींच्याकडं वळून राजांनी आज्ञा दिली, ‘बाजी, बुरूज बांधून घ्या. आणि ह्या बुरूजाचं नाव दौलती-बुरूज ठेवा.’
मावळ्यांनी मोठ्या उत्साहानं सांगड करून भांडी तोलली. ‘जय जगदंब!’ म्हणून ती भांडी घेऊन ते सदरेकडं जाऊ लागले.
सौजन्य :- सर्व क्रमशः लेख ( श्री. सागर पाटील – सोशल मिडिया