भुषण वडनेरे, धुळे (प्रतिनिधी):- शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय, त्यात काही राम राहिलेला नाही असा सूर हल्ली बहुतेकांच्या तोंडी ऐकायला मिळतो. मात्र, योग्य नियोजन, व्यवस्थापन व मार्गदर्शन घेऊन शेती केल्यास त्यातूनही श्रीमंतीकडे कशी वाटचाल करता येते, हे साक्री तालुक्यातील अष्टाणे येथील प्रगतशील 28 वर्षीय युवा शेतकरी ललित जगदीश देवरे यांनी सिद्ध करुन दाखवले आहे. विशेष म्हणज,े ललित देवरे हे स्वत: उच्च शिक्षित असून त्यांचे कुटुंबीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर आहेत. असे असतानाही ललित देवरे यांनी नोकरीच्या मागे न धावता, शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. त्यांनी एकात्मिक शेती पद्धतीची कास धरत वर्षभरात पपईच्या चौदाशे रोपांची लागवड करुन दोन एकरात तब्बल 13 लाखांचे उत्पन्न मिळविले. म्हणजेच एकरी सुमारे साडेसहा लाखांची कमाई केली. आपल्या विविध प्रयोगांमुळे ललित देवरे हे परिसरात प्रगतशील शेतकरी म्हणून सुपरिचित झाले आहेत. परिसरातील ज्येष्ठ शेतकरी देखील त्यांचे मार्गदर्शन घेतात.
साक्री तालुक्यातील अष्टाणे हे ललित देवरे यांचे छोटेसे गाव. गावात त्यांची वडीलोपार्जीत दहा एकर शेती आहे. देवरे परिवारात ललित देवरे यांचे काका प्रा. अविनाश देवरे व मुख्याध्यापक संदीप देवरे, आजोबा निवृत्त शिक्षक सुरेश देवराव देवरे आदी अनेक जण शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यामुळे ललित यांनी शिक्षक व्हावे, अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. आई-वडील घरची दहा एकर शेतीच पाहत होते. कुटुंबियांच्या आग्रहास्तव ललित यांनी बी. एस्सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बी.एड. केले. त्यानंतर दुसाणे येथील एका आश्रमशाळेत नोकरीला लागले. मात्र, ही आश्रमशाळा 20 टक्के अनुदानित असल्याने त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते. शिवाय येण्याजाण्यावरही मोठाखर्च व्हायचा. बर्याच वेळा आश्रमशाळेतच मुक्कामी राहावे लागायचे. त्यामुळे शेतीकडे त्यांच पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. दुसरीकडे नोकरीतूनही समाधान लाभत नव्हते. त्यामुळे त्यांनी नोकरीला रामराम ठोकत शेतीतच पूर्णवेळ लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी ठरवले.
…अन् शेतीकडे लागला ओढा!
ललित देवरे हे शिक्षण घेत असतानाच 2011-12 पासून धुळ्यातील कृषी विज्ञान केंद्रात जाणे कृषी विभागातर्फे शेतकर्यांसाठी आयोजित कार्यशाळांना उपस्थित राहणे, सोशल मिडीया, शेतकरी सहल, युट्यूबच्या माध्यमातून आधुनिक शेतीची माहिती मिळविणे, आई-वडिलांना शेतातील कामात मदतीसाठी जाणे अशी कामे करीत होते. त्यामुळे आपोआपच त्यांचा ओढा शेतीकडे वाढला. नोकरी करण्याची त्यांची सुरवातीपासूनच इच्छा नसल्याने ललित देवरे यांनी 2015 पासून प्रत्यक्ष शेती करण्यास सुरुवात केली.
पपई लागवडीतून भरघोस उत्पन्न!
ललित देवरे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षात धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सहाय्याने शेतात अनेक नवीनवीन प्रयोग करून प्रगती साधली आहे. गेल्यावर्षी त्यांनी दहा पैकी दोन एकरवर फेब्रुवारीत तैवान 876 जातीच्या पपईची लागवड केली. ती करण्यापूर्वी त्यांनी रब्बी हंगामात या दोन एकरवर कोणतेही पीक घेतले नव्हते. लागवडपूर्व मशागत करताना त्यांनी ताकबियाणे (हिरवळीचे खत) टाकले. ते छातीएवढे वाढल्यानंतर नांगराच्या सहाय्याने जमिनीत गाडले. त्यानंतर रोटर मारले. मग शेणखत टाकून पुन्हा रोटर मारले. पुन्हा संपूर्ण दोन एकरात शेणखत पसरवले. त्यासाठी 10 ट्रॅक्टर ट्रॉली शेणखत लागले. नंतर दोन ओळीतले अंतर 8 बाय 7 फूट व दोन झाडातले अंतर 7 फूट ठेवून ठिबकच्या नळ्या अंथरल्या. अशी त्यांनी रोपांची लागवड केली. त्यानंतर 15 दिवसातून स्लरी देणे तसेच महिन्यातून जीवामृत देणे, निंबाळी अर्क फवारणी करणे, मायक्रो न्युट्रॉन्स देणे तसेच किडरोग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 15-20 दिवसांनी किटकनाशक, बुरशीनाशकाची फवारणी करणे अशी सहा महिन्यांपर्यंत ट्रिटमेंट दिली. त्यानंतर सातव्या महिन्यापासून त्यांना पपईचे उत्पन्न प्राप्त होण्यास सुरुवात झाली. विशेष म्हणजे त्यांची एकेक पपई जवळपास 6 किलोची होती. लागवडीनंतर वर्षभरात म्हणजे मार्च 2021 पर्यंत त्यांनी दोन एकर क्षेत्रातून पपईचे तब्बल 13 लाखांचे उत्पन्न घेतले. यात सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत त्यांना 11 ते 12 रुपयांचा आणि त्यानंतर 5 ते 10 रुपयांचा प्रती किलोचा दर मिळाला. सुरुवातीला चांगला दर मिळाल्याने मोठा फायदा झाल्याचे ललित देवरे सांगतात. दोन एकर पपईतून एकूण 13 लाखांचे उत्पन्न म्हणजेच एकरी साडेसहा लाखांचे उत्पन्न त्यांना मिळाले. विशेष म्हणजे, त्यांनी पहिल्यांदाच आपल्या शेतात पपई लागवड केली होती. लागवडीपूर्वी त्यांनी दोन वर्षे लागवड करण्यापासून ते व्यवस्थापन, किड रोग नियंत्रण, हवामान, माती परिक्षण असा सखोल अभ्यास केला. त्यानंतर बाभूळवाडी येथून पपईची चौदाशे रोपे घेऊन लागवड केली. त्यामुळे शेतकर्यांनी शेती करताना अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करुनच शेती करावी, असे ललित देवरे आवर्जुन सांगतात. विशेष म्हणजे, इतर पिकांबाबतही नवनवीन प्रयोग करीत ते उत्पन्न वाढीसाठी प्रयत्नशील असतात.
सेंद्रीय उत्पादनावर भर!
ललित देवरे यांचा सुरुवातीपासूनच सेंद्रीय शेतीवर भर राहिला आहे. त्यांच्याकडे सध्या दोन म्हशी तसेच आंतर मशागतीसाठी एक बैलजोडी असून यामधून अतिरिक्त सेंद्रिय खत उत्पादन सुद्धा घेत आहेत. दहा एकर शेती क्षेत्रासाठी या चार जनावरांचे शेणखत पुरेसे ठरत नसल्याने अतिरिक्त शेणखत खरेदी करुन ते शेतीसाठी वापरतात. सेंद्रीय शेतीमुळे पौष्टीक उत्पादन मिळते, त्यातून आरोग्यही चांगले राहते. शिवाय कोणत्याही नवीन पिकाची लागवड करताना ते सखोल माहिती घेऊन व अभ्यास करुनच ते लागवड करत असतात. कोणीही उठावे शेती करावी, असे करणे म्हणजे आर्थिकदृष्टया नुकसानीचे ठरु शकते, असेही ते सांगतात.
एकरी 70 टन उसाचे गाठले उद्दिष्ठ!
पपई सोबतच ललित देवरे यांनी आपल्या उर्वरीत शेतात कांदा व उसाची लागवड केली होती. त्यातही त्यांनी एकरी 70 टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ठ गाठले. त्यातून त्यांना सरासरी एक लाख 75 हजार रुपये उत्पन्न मिळाले. यासाठी त्यांची नामांकित संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे 100 टन उत्पादनासाठी निवड प्रस्तावित करण्यात आली असून द्वारकाधिश कारखान्यातर्फे झालेल्या निवड कार्यक्रमात त्यांची शिफारस करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी ते सुमारे 3 एकरात उसाची लागवड करतात. त्यातून हमखास 65 ते 70 टन उसाचे उत्पादन होते. इतर पिकांत नुकसान झाले तरी उसामुळे हे नुकसान भरुन निघते. त्यामुळे उस म्हणजे माझी एफ. डी. आहे, असे ललित देवरे आवर्जुन सांगतात.
कांद्यांचेही विक्रमी उत्पादन!
भाजीपाल्यासह कांद्याचेही विक्रमी उत्पादन घेण्यात ललित देवरे यांनी यश संपादन केले आहे. 2016 मध्ये त्यांनी एकरी 180 क्विंटल कांदा उत्पादन घेऊन त्यातून सरासरी 1700 रुपये भावाप्रमाणे 3 लाख 6 हजारांचे उत्पन्न मिळवले. त्यानंतर त्यांना कृषी विज्ञान केंद्राकडून कांदा चाळही मंजूर झाली. मात्र, काद्यांना मेंटेनन्स जास्त असल्यामुळे व हार्वेस्टिंग पिरीयडमध्ये केवळ 600 ते 700 रुपयांचा दर मिळत असल्यामुळे फारसा नफा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी 2017 पासून कांदा लागवड करणे बंद केले. मात्र, हार्वेस्टींग पिरीयडमध्ये म्हणजे 15 मार्च ते 15 मे या काळात कांद्यांची खरेदी करुन ते आपल्या चाळीत साठवून ठेवतात. यातून चाळीचाही वापर होतो, शिवाय या कांदा विक्रीतून नंतर तीन ते साडेतीन हजार रुपयांचा दर मिळत असल्याने आपल्याला चांगला नफा मिळत असल्याचे ललित देवरे सांगतात.
बांधावरच मालाची विक्री!
शेतीमाल हा नाशवंत असल्याने बर्याचदा शेतकर्यांना मिळेल त्या भावात मालाची विक्री करावी लागते. यातून कधीकधी तोटाही सहन करावा लागतो. ललित देवरे यांनी शेताच्या बांधावरच मालाची विक्री करण्यावर भर दिला आहे. देवरे परिवारात ललित देवरे हे एकुलते एक असल्याने लागवडीपासून विक्रीपर्यंतची जबाबदारी त्यांना एकट्यालाच पार पाडावी लागते. त्यामुळे विक्रीसाठी बाजारात माल नेऊन विकण्याएवढा वेळ नसतो. शिवाय मालाची वाहतूक करणेही खर्चिक ठरते. त्यामुळे ते व्यापार्यांशी संपर्क साधून बांधावरच मालाची विक्री करतात. त्यांचा माल सेंद्रीय असल्यामुळे व्यापारीही स्वत: तोडणी करुन मोजून घेऊन जातात.
ज्यामुळे वेळ व पैशांची बचत होते. दरवर्षी दहा एकरातून विविध पिकांच्या लागवडीतून सरासरी 17 ते 18 लाखांची उलाढाल होत असल्याचेही देवरे सांगतात. आता मला कोणी फुकट नोकरी दिली तरी मी ती करणार नाही, असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात. दरम्यान, आगामी काळात आपल्या दहा एकरपैकी 3 एकरवर ऊस, दोन एकरात भाजीपाला, तीन एकरात फळबाग लागवड करण्याचे ललित देवरे यांचे नियोजन आहे.
शेतकर्यांना मार्गदर्शन!
आपल्या ज्ञानाचा फायदा परिसरातील शेतकर्यांना व्हावा, हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ललित देवरे यांच्याकडून इतर शेतकर्यांनाही निःशुल्क मार्गदर्शन केले जाते. त्यात शेतात रसायनिक खते, युरिया याचा वापर कमी करण्यासाठी, सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करण्यासाठी ते पशु संगोपन, तागशेती, शेणखताचा, गांडूळखताचा, जैैविक कीडनाशके यांचा वापर अधिक शेतकर्यांनी करावा याबाबत ते जनजागृतीचे काम करतात. शेतीत प्रयोग
करण्याच्या कामात त्यांना धुळे येथील कृषी विज्ञान केंद्रासह कृषी विभाग, साक्री तालुका कृषी अधिकारी सी. के. ठाकरे, कृषी सहायक जे. बी. पगारे, मित्र रईस सय्यद व कुसुंबा येथील फार्मर प्रॉडक्शन कंपनीचे महेंद्र निंबा परदेशी यांचेही नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. विशेष म्हणजे, ललित देवरे हे साक्री तालुका पीक विमा कमिटीचेही ते सदस्य आहेत. पीक विमा संदर्भात शेतकर्यांना येणार्या अडचणी सोडविण्याचे काम त्यांच्या माध्यमातून केले जाते. अष्टाने परिसरात कृषीमित्र म्हणून ते शेतकर्यांना मार्गदर्शन करीत असतात.
कृषी विज्ञान केंद्राचे मोलाचे मार्गदर्शन!
शेतात प्रयोग न करता बियाणे, खतांमध्ये नवीन काय बदल होत आहेत, याचाही अभ्यास ललित देवरे सातत्याने करीत असतात. त्यासाठी धुळे येथील कृषी विज्ञान केंद्राशी ते संपर्कात असतात. तेथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे (फळबाग लागवड तंत्रज्ञान), डॉ. पंकज पाटील (एकात्मिक किड रोग व्यवस्थापन ), जगदीश काथेपुरी (कृषी विद्या), रोहित कडू (उद्यान विद्या), डॉ. अतिश पाटील (एकात्मिक खत व्यवस्थापन) या शास्त्रज्ञांसोबत सातत्याने नवीन पिकांबाबत चर्चा करणे, त्यांच्याकडून माहिती प्राप्त करून घेणे आणि इतरही माहितीची देवाणघेवाण ते करीत असतात. कृषी विज्ञान केंद्राच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या समितीवर ते सदस्य आहेत. याशिवाय राजमुद्रा फार्मर प्रॉडक्शन कंपनीचेही ते संचालक आहेत. शेतकर्यांनी पिकविलेला माल त्याने बाजारात विक्री करावा या तत्वावर या कंपनीची स्थापना झाली आहे. गटशेतीसाठीही ते पुढाकार घेतात. अनेक ठिकाणी गटशेती करणार्यांना त्यांचे मार्गदर्शन लाभत असते.
मार्गदर्शनाचा शेतकर्यांना फायदा!
कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱयांना वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. शेतकर्यांसाठी विविध प्रशिक्षणांचे शिबिरे आयोजित केली जातात. शेतकर्यांचा उत्पन्न स्तर वाढविण्यासाठी शेतीपुरक व्यवसायांबाबत मार्गदर्शन केले जाते. याचा फायदा घेत युवा शेतकरी ललित देवरे यांनी शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. गेल्या वर्षी दोन एकरमध्ये पपई लागवड करुन त्यांनी 13 लाखांचे विक्रमी उत्तपन्न प्राप्त केले. उच्च शिक्षणाचाही फायदा ललित देवरे यांना होत आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांनी परिसरात स्वत:ची ओळख तयार केली आहे. शेतकर्यांनी निरीक्षणातूनही शिकत राहीले पाहीजे. बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकर्यांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबतची माहितीही कृषी विज्ञान केंद्रातर्फे दिली जाते. प्रसंगी बांधावर जाउन मार्गदर्शन केले जाते.
– डॉ. दिनेश नांद्रे, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक
कृषी विज्ञान केंद्र, धुळे.
नोकरीपेक्षा शेती फायद्याची!
आजच्या युवा पिढीला शेतीत खूप काही करुन दाखविण्यास वाव आहे. त्यामुळे तरुणांनी विशेषत: शेतकर्यांच्या मुलांनी शहरात जाऊन एखाद्या कंपनीत नोकरी करण्यापेक्षा केवळ दोन एकरात शेती केली तरी ती त्यांना फायद्याची ठरु शकते. मात्र, त्यासाठी मनाची देखील तयारी असली पाहिजे. सोबतच शेती करणारा हा उच्च शिक्षित असला पाहिजे. त्याने अगोदर शेतीचा पूर्ण अभ्यास करावा. पिकांवर पडणारे रोग, किडीचे प्रकार, त्यावर कोणती फवारणी करावी किमान यांची माहिती असली पाहिजे. कारण आज बाजारात अनेक औषधे उपलब्ध आहेत. त्यात कोणते घटक आहेत, त्याचा वापर किती प्रमाणात व कसा करावा याची माहिती असावी. यासोबतच माती परीक्षण, हवामान, पीक पद्धती, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, योजना आदींचा सखोल अभ्यास करुनच शेती व्यवसायात उतरावे असे केल्यास शेतीतून चांगली आर्थिक प्रगती साधता येईल.
– ललित देवरे, प्रगतशील शेतकरी, अष्टाणे, ता. साक्री
मो. नं. 9158950013