मुंबई, नवी मुंबईत पावसाला सुरुवात; पूर्वमोसमी सरींमुळे पारा खालावला..
मुंबई – निसर्ग चक्रीवादळ गेल्या सहा तासांत ताशी 13 किलोमीटर वेगाने पुढे सरकलंय आणि ते पुढील 12 तासांत अधिक तीव्र असं त्याचं ‘सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म’चं रूप धारण करू शकतं असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
प्रतिताशी 100 ते 110 किमी वेगाने वारे वाहतील..
वादळी वारे कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचेपर्यंत वाऱ्याचा वेग प्रतिताशी 65-75 किमीहून 85 पर्यंत पोहोचणार आहे. तर 3 जूनच्या सकाळी हे वारे महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर प्रतिताशी 100 ते 110 किमी वेगाने वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
चक्रीवादळ अलिबागजवळ आदळणार..?
निसर्ग चक्रीवादळ हरिहरेश्वर आणि दमणच्या मधून जाईल असा अंदाज पहिल्यापासूनच वर्तवला जात होता. हवामान विभागाने हे वादळ 3 जूनच्या दुपारी अलिबागजवळ जमिनीवर धडकेल असा अंदाज आता वर्तवला आहे. निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर पोहोचणार असल्याने प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
इमेज सायंकाळी 8 वाजता..
चक्रीवादळ उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल..
निसर्ग चक्रीवादळ 3 जूनच्या सुमारास मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या किनारपट्टीवर पोहचेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यानंतर हे वादळ दक्षिण गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राकडे सरकेल. खबरदारीचा उपाय म्हणून मदत व बचाव कार्य करण्यासाठी एनडीआरएफच्या 16 तुकड्यांपैकी 10 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, SDRFच्या सहा तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. मंत्रालयातदेखील 24 तास नियंत्रण कक्ष सुरू असून लष्कर, हवाई दल, नौदल, भारतीय हवामान विभाग यांना समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाच्या सरी..
महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान तयार होऊन राज्यातील बहुतेक भागात कमी अधिक प्रमाणात पूर्वमोसमी पावसाच्या सरींना सुरुवात झाली आहे. यामुळे राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील तापमानाचा पारा खालावला. या वादळामुळे झाडे पडणे, भूस्खलन, जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं.
नागरिकांनी काय काळजी घ्यावी..?
-घराबाहेर असलेल्या मोकळ्या वस्तू अन्यत्र ठिकाणी हलवा.
-महत्त्वाचे दस्ताऐवज प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधून ठेवा.
-बॅटरीवर चालणाऱ्या आणि राखीव पॉवरच्या यंत्रांची नियमित परीक्षण करा.
-दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या बातम्यांकडे, सूचनांकडे लक्ष ठेवा.
-आपात्कालीन उपयोगी वस्तूंची किट बॅग तयार ठेवा.
-मोठं छप्पर असलेल्या जागा टाळा. डोकं आणि मानेच्या संरक्षणासाठी हातांचा उपयोग करा.
-विद्युत उपकरणं तपासा.
-पिण्याचे पाणी स्वच्छ ठिकाणी साठवून ठेवा.