पुणे ः राज्यात सन 2004 पासून अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी केली जात आहे. द्राक्ष निर्यातीला चालना देण्यासाठी निर्यातक्षम द्राक्ष बागांच्या नोंदणीला उत्स्फुर्त प्रतिसादही मिळत आहे. कृषी विभागाने त्यासाठी पुढाकार घेतला असून आतापर्यंत 2 कोटी 46 लाख 235 मेट्रीन टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली असून त्यापैकी 1 कोटी 5 हजार 356 टन निर्यात एकट्या युरोपियन युनियनला करण्यात आली आहे. शेतकर्यांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी तथा नुतनीकरणााठी 20 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून त्याचा शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे कृषी आयुक्तालयाने केले आहे.
द्राक्षांची विक्रमी निर्यात
युरोपियन युनियन व इतर देशांना द्राक्ष निर्यातीकरीता किड व रोगमुक्त, उर्वरित अंश हमी देण्यासाठी सन 2004 पासून राज्यात अपेडाच्या सहकार्याने ग्रेपनेट प्रणालीव्दारे निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी सुरु झाली. नोंदणीसह द्राक्ष बागांची तपासणी, किड व रोगमुक्त हमी अॅगमार्क प्रमाणिकरण, फायटोसॅनिटरी प्रमाणिकरण या सर्व बाबी ग्रेपनेट प्रणालीव्दारे प्रभावीपणे केल्या जात आहेत. राज्यात प्रामुख्याने द्राक्षाचे उत्पादन नाशिक, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद, लातूर व जालना या जिल्ह्यात होते. सन 2020-21 मध्ये ग्रेपनेटव्दारे 45 हजार 385 निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आली. कोरोनाच्या काळात कृषी विभागाने योग्य प्रकारे नियोजन केल्याने 2 कोटी 46 लाख 235 मेट्रीक टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली असून त्यापैकी 1 कोटी 5 लाख 356 मेट्रीक टन निर्यात युरोपियन युनियनला करण्यात आली आहे. द्राक्ष उत्पादक, फलोत्पादन विभाग, द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे, अपेडा, विभागीय पीक संरक्षण कार्यालय, मुंबई व इतर सहभागदार संस्थाच्या योगदानामुळे ही निर्यात करणे शक्य झाल आहे.
जिल्हास्तरावर मार्गदर्शन केंद्र
फळे व भाजीपाला निर्यातीला चालना देण्यासाठी यंदा कृषी विभागातर्फे खास उपक्रम राबविण्यात येत आहे. ज्यामध्ये सर्व जिल्हास्तरावर कृषी माल निर्यात मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. फळे व भाजीपाल्याच्या ऑनलाइन नोंदणीसाठी फार्म रजिस्ट्रेशन मोबाईल अॅपचा वापर करण्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे. निर्याती बरोबरच स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांना किड व रोगमुक्त फळे व भाजीपाला उपलब्ध करुन देण्यासाठी 1 लाख 54 हजार निर्यातक्षम शेतनोंदणी लक्षांक निर्धारित करण्यात आलेला आहे. द्राक्षांची आतापर्यंत युरोपियन युनियनला करण्यात आलेली निर्यात लक्षात घेता, द्राक्ष बागांची नोंदणी तथा नुतनीकरणासाठी तालुका स्तरावरुन खास मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. 30 नोव्हेंबर 2021 अखेर 23 हजार 603 द्राक्ष बागांची नोंदणी करण्यात आलेली आहे. नाशिक व पुणे जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमध्येही निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंद जास्त झालेली आहे. नाशिक जिल्ह्यातील क्षेत्र व निर्यातक्षम द्राक्ष बागांचा नोंदणी लक्षांक तसेच शेतकरी व लोकप्रतिनिधींची मागणी लक्षात घेता, नोंदणी तथा नुतनीकरणासाठी 20 डिसेंबर 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या संदर्भातील अधिक माहिती व नोंदणीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकार्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे येथील कृषी आयुक्तालयाने केले आहे.