नांदेड : मराठवाडा हा नेहमीच दुष्काळग्रस्त भाग म्हणून असलेली ओळख पुसण्याचा प्रयत्न करीत आहे. पावसाचे सरासरी प्रमाण कमी असल्याने प्रयोगशील शेतकरी आत या समस्येवर मात करत नवनवीन प्रयोग करीत आहेत. असाच काहीसा प्रयोग नांदेड जिल्ह्यातील धनगरवाडी येथील ४५ वर्षीय अल्पभूधारक शेतकरी हरी गोपीनाथ पगडे यांनी आपल्या रेशीम शेतीच्या माध्यमातून केला आहे. आपल्या दोन एकर रेशीम शेतीच्या माध्यमातून वर्षाकाठी ते चार ते साडेचार लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत.
निसर्गरम्य वातावरणात टेकडीवर वसलेले धनगरवाडी हे गाव नांदेडपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर आहे. शहर जवळ असले तरी बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेतीच आहे. निसर्गरम्य वातावरण लाभलेल्या या गावाची लोकसंख्या जवळपास १ हजार आहे. गावातील याच गावातील हरी गोपीनाथ पगडे हे सन २००० पूर्वी दोन एकर शेतीमध्ये कापूस, सोयाबीन व वेगवेगळ्या भाजीपाल्यांची लागवड करत असत; परंतु खर्च व उत्पन्न यांचा मेळ बसत नसल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे या पारंपारिक पिकांमधून पाहिजे तसे उत्पादन आणि नफा होत नसल्याने हरी पगडे यांनी नवीन काही करता येईल का याची चाचपणी केली असता त्यांना कृषी विभागाकडून रेशीम शेतीच्या माध्यमातून एक शाश्वत उत्पन्न देणारी नवीन संधी उपलब्ध झाली. त्यांनी एक एकरमध्ये पारंपारिक पिक आणि एका एकरमध्ये तुतीची लागवड करत राहत्या घरातील एका १०×१० च्या खोलीत त्यांनी १०० अंडी पुंज घेऊन रेशीम शेतीला सुरवात केली. सन २०१० मध्ये कृषी विभागाच्या शेतकरी शैक्षणिक सहलीने सन २००० पासून रेशीम शेत करत असलेल्या हरी पगडे यांच्या रेशीम शेतीला खऱ्या अर्थाने नवसंजीवनी दिली. या सहलीनंतर शेतात शेड निर्माण करून त्यांनी परिपूर्ण रेशीम शेतीला सुरुवात केली.
सन २०१० मध्ये कृषी विभागाच्या शेतकरी सहलीत बेंगलोर येथील रामनगरच्या रेशीम मार्केट व बारामती कृषी विज्ञान केंद्र व जळगाव येथील काही प्रगतशील शेतकऱ्यांची भेट घेऊन गावी धनगरवाडी येथे परतल्यानंतर त्यांनी रेशीम शेतीत बदल करण्याचे निश्चित केले त्यानुसार शेतात शेड उभारण्याचे ठरवले. आणि शेतातच रुंदी २२ फुट लांबी ६० फुट असलेले शेड पुर्व-पश्चिम अशा पद्धतीने शेडची उभारणी केली. या शेडसाठी दोन ते अडीच लाख रुपये पगडे यांनी सुरूवातीला खर्च केले. दुसऱ्या वर्षी सिडीपी अंतर्गत त्यांना १ लाख रुपये अनुदान मिळाले.
तुती लागवड आणि व्यवस्थापन :
एका एकरच्या शेतीतून त्यांना रेशीम उद्योगातून वर्षाकाठी ४ ते ५ लाखांचे उत्पन्न मिळू लागले होते. इतर पिकांच्या तुलनेत त्यांना एक एकर मधून चांगला नफा मिळू लागल्याने हरी पगडे यांनी तुती लागवडचे क्षेत्र वाढविण्याचे ठरविले. हरी पगडे यांनी एक एकर शेतीत अजून तुतीच्या व्हि.वन या प्रचलित जातीची लागवड करून वर्षाकाठी १७०० ते १८०० अंडी पुंज पोसले जातील याची व्यवस्था करून रेशीम शेतीला अजून वाढविले. त्यांना या कामासाठी त्यांच्या पत्नी पद्मीनबाई, दोन मुले श्रीरंग व विजय हे मदत करत असतात. ते वर्षातून ७ ते ८ बॅच घेतात. रेशीम आळ्यांच जीवन हे २८ दिवसांचा असते. १५, १६ दिवस त्यांना खाद्य पुरवठा करावा लागतो. २० दिवसानंतर कोश अवस्था तयार होते. पुढील ५ ते ६ दिवस कोश परिपक्व झाल्यानंतर कोश वेचणीला दोन दिवस लागतात.
खर्च आणि फवारणी
रेशीम शेतीमध्ये वर्षाकाठी ७ ते ८ बॅच होतात. एका बॅचला लागणाऱ्या तुतीसाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च तुतीसाठी येतो. तुतीला दरवेळेस मिश्र खताचा वापर करण्यात येतो. एप्रिल व मे महिन्यात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दोन महिने बॅच बंद असतात. यामुळे या दोन महिन्यात मशागत करून शेणखत टाकण्यात येते. शेणखतासाठी ४ ते ५ हजार रुपये खर्च होतो. प्रत्येक बॅच नंतर शेडची निर्जंतुकीकरण करण्यासाठी किमान ५०० ते ६०० रुपये खर्च करण्यात येतो. यामध्ये २ लिटर पाण्यात ५ किलो ब्लिचिंग आणि १० किलो चूना वापरण्यात येतो, तसेच अस्त्रा औषधाची फवारणी करण्यात येते. दोन एकरमध्ये वर्षाकाठी जवळपास ४० ते ५० हजार रुपये (७ बॅचसाठी) खर्च येतो.
उत्पन्न आणि विक्री
दरवर्षी दोन एकर तुतीवर १४ क्विंटल रेशीम होत असते. सन २०१७, २०१८ मध्ये १० क्विंटल रेशीम झाले होते. त्यावेळी १ क्विंटलला ४० ते ५० हजार रुपये भाव मिळाला होता. तर गतवर्षी २०१९ मध्ये १ क्विंटलला ३० ते ३५ हजार रुपये भाव मिळाला होता. वर्षाकाठी एकरी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. रेशीमची विक्री पूर्वी बंगलोर येथे नेऊन केली जात असे. मागील वर्षापासून रेशीमचे कोश पूर्णा, जालना व बारामतीला विक्रीसाठी नेण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूक खर्च देखील कमी झाला आहे. दरातही काही जास्त प्रमाणात तफावत नाही.
कोरोनाचा रेशीम शेतीला फटका
मागील काही दिवसांपासून देशभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या संख्येने वाढत आहे. यामुळे लाॅकडाऊन करण्यात आले होते. आता लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आली असली तरी संपूर्ण व्यवहाराची अजूनही घडी बसली नाही. याचा शेती व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे. दरवर्षी १ कुंटल रेशीमची ४० ते ५० हजार रुपये दराने विक्री होत असते; परंतु कोरोनामुळे जुलै २०२० मध्ये १ कुंटल रेशीमला केवळ १८ हजार रुपये भाव मिळाला आहे. यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत.
रेशीम शेती करण्यासाठी मला कृषी विभाग आणि रेशीम विकासच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. मी सन २००० पासून रेशीम शेतीकडे वळल्यानंतर माझ्या चारही बंधूनी रेशीम शेतीला सुरूवात केली. मी प्रत्येक शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्याचा सल्ला देऊन मार्गदर्शन करत असतो. आजघडीला आमच्या धनगरवाडी गावातील ७० ते ८० टक्के शेतकरी रेशीम शेती करत आहेत. दरवर्षी १४ क्विंटल रेशीमचे उत्पादन यंदा १६ क्विंटल पर्यंत नेण्याचा प्रयत्न असणार आहे.
हरी गोपीनाथ पगडे – (शेतकरी, धनगरवाडी)
_______________________
धनगरवाडी येथील काही निवडक शेतकऱ्यांना शेतकरी सहलीमध्ये सहभाग नोंदवून बंगलोर, बारामती कृषी विज्ञान केंद्र व जळगाव येथील प्रगतशील शेतकऱ्यांना भेटी दिल्या. व रेशीमच्या अनुषंगाने त्यांना मार्गदर्शन केले. तसेच धनगरवाडी येथे गावात जाऊन तेथील शेतकऱ्यांसह महिला बचतगटांना रेशीम शेती बद्दल वेळोवेळी मार्गदर्शन केले. हरी पगडे यांनी रेशीमची शेती करत धनगरवाडी गावाजवळील लोहा तालुक्यातील वडेपुरी, मार्तंड, विष्णूपुरी, खुपसरवाडी, पावडेवाडी, कोटतीर्थ येथील शेतकऱ्यांना रेशीम शेती करण्यासाठी मार्गदर्शन केले. आज जवळपास या सर्वच गावातील ६० ते ७० टक्के शेतकरी रेशीम शेती करत आहेत.
वसंत जारीकोटे – (कृषी पर्यवेक्षक, नांदेड)