कृषी खात्याच्या निर्णयामुळे खऱ्या अर्थाने “पर ड्रॉप मोअर क्रॉप” संकल्पना रुजणार…!
प्रतिनिधी ,जळगांव
केंद्र सरकारची महत्वपूर्ण घोषणा “पर ड्रॉप मोअर क्रॉप” ( प्रती थेंब जास्त उत्पादन) च्या संकल्पनेनुसार सरकारने सोमवारी सूक्ष्म सिंचनाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार शेतकऱ्यांकडून पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म सिंचन संचाला यापूर्वी दहा वर्षाची मुदत शासनाच्या धोरणानुसार देण्यात आलेली होती ती बदलून आता सात वर्ष करण्यात आली आहे. एखाद्या क्षेत्रावर शेतकऱ्याने शासकीय योजनेतून सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतल्यानंतर त्या क्षेत्रावर त्याला दहा वर्षानंतर पुन्हा लाभ देण्यात येत होता, मात्र दहा वर्ष सूक्ष्म सिंचन संचाचे आयुष्यमान नसल्याने दहा वर्षापर्यंत ते टिकत नव्हते, पर्यायाने शासनाच्या धोरणामुळे अशा शेतकऱ्यांना दहा वर्षापर्यंत लाभ मिळत नव्हता.
दहा वर्ष कमी करण्यात यावी अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत होती, या मागणीची दखल घेऊन सूक्ष्म सिंचन संचाची दहा वर्ष असलेली मर्यादा शासनाच्या कृषी विभागाने रद्द करीत ती आता सात वर्षे केली आहे. त्यामुळे सूक्ष्म सिंचनापासून वंचित राहणाऱ्या शेतकऱ्यांना याचा लाभ यामुळे मिळणार असून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म सिंचन योजनांना केंद्र सरकारने आर्थिक प्राधान्य दिले असून, कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनासाठी प्रोत्साहित केले जात आहे. सन 2014-15 पर्यंत सूक्ष्म सिंचन योजना केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत राबविण्यात येत होती. सन 2015-16 पासून ही योजना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रती थेंब अधिक पिक (सूक्ष्म सिंचन) घटकांतर्गत राबवण्यात येत आहे. या योजनेच्या मार्गदर्शक सूचनात शासनाने बदल करून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना अंतर्गत सन 2019-20 या वर्षात शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाचा लाभ घेतल्यानंतर त्यांना पुन्हा त्या क्षेत्रावर सात वर्षानंतर लाभ घेता येणार असल्याबाबतचा निर्णय शासनाने सोमवारी घेतला आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला असून भविष्यात या योजनेच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आता मावळली आहे.
प्रतिक्रिया शेतकरी पुन्हा चांगल्या दर्जाची सूक्ष्म सिंचन यंत्रणा विकत घेऊ शकतो. आता आम्ही वापरात असलेल्या सूक्ष्म सिंचन संचाचे आयुष्यमान पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे नाही. ऊन, वारा, पाऊस या घटकामुळे त्याची टिकण्याची क्षमता संपलेली असते, त्यामुळे असे संच वापरल्यामुळे पाणी बचतीपेक्षा नासाडीच जास्त होते म्हणून शेतकऱ्यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत दहा वर्षानंतर लाभ देण्याची अट कमी करण्याची मागणी केली होती या मागणीला आज यश आले आहे. ठिबक संच या मुदतीपूर्व खराब होत असल्याने कमी दर्जाचा ठिबक संच घ्यावा लागत होता तोही फक्त २ वर्ष टिकत असल्याने शेतकऱ्यांचे जास्त नुकसान होत असे. या निर्णयामुळे शेतकरी पुन्हा चांगल्या दर्जाची सूक्ष्म सिंचन यंत्रणा विकत घेऊन आर्थिक नुकसान टाळू शकतो. संजय पाटील, शेतकरी भारुडखेडा ता.जामनेर जि.जळगांव