जळगाव ः एका एकरात किमान तीन वेळा जिरेनियमची कापणी करता येते. यातून वर्षाकाठी दोन ते अडीच लाखांचे हमीचे उत्पन्न शेतकर्यांना मिळू शकते. एकदा पीक लावल्यानंतर किमान तीन वर्षे पुन्हा लागवडीची गरज नाही. आजमितीस भारताला 250 टन जिरेनियमच्या तेलाची गरज असून भारत फक्त दहा टन ऑईल निर्मिती करतो. त्यामुळे उरलेले ऑईल आयात करावे लागते. याचाच अर्थ देशांतर्गत जिरेनियमला मोठी मागणी असून या पिकातून शेतकर्यांना उज्ज्वल भवितव्य आहे, अशी अशी माहिती जळगावच्या कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य डॉ. मधुकर बेडीस यांनी दिली.
अॅग्रोवर्ल्डतर्फे नुकत्याच झालेल्या जिरेनियम कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यशाळेचा समारोप दुपारी चारला होणार असतानाही शेतकर्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे ही कार्यशाळा साडेपाच वाजेपर्यंत चालली. यावेळी कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जिरेनियम उत्पादक मंगेश महाले व अॅग्रोवर्ल्डचे संपादक शैलेंद्र चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
ऑईल प्रक्रिया व विक्रीबाबत काळजी करू नये ः मंगेश महाले
जिरेनियमची लागवड करुन स्वतः तेल निर्मिती करणारे सायगाव (ता. चाळीसगाव) येथील जिरेनियम उत्पादक शेतकरी मंगेश महाले यांनी जिरेनियमच्या लागवडीपासून ते तेल निर्मितीपर्यंतची संपूर्ण माहिती पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून सोप्या भाषेत समजावून सांगितली. शेतकर्यांनी पारंपरिक पिकांची लागवड न करता, काळाची गरज व बाजारातील मागणी लक्षात घेऊन जिरेनियमसारख्या सुुगंधी वनस्पतीची लागवड करावी. एका एकरामध्ये एका वर्षात जिरेनियमच्या साधारणतः 40 टन बायोमास उत्पादनातून 30 ते 40 किलो तेल मिळते. सध्या बाजारात जिरेनियमच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. रोपांच्या लागवडीपासूनच योग्य नियोजन करुन व्यवस्थित लक्ष दिले तर जिरेनियमपासून शेतकर्यांना साधारणतः एका वर्षांत साडेतीन ते सव्वा चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. जिरेनियमची शेती शेतकर्यांसाठी सध्या तरी फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव स्वतःला आलेला आहे. जिरेनियमचा वापर हा सौंदर्य प्रसाधने, पानमसाला उद्योग, साबण, अत्तर, सुगंधी उद्योग यामध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. सध्या भारतात मोठ्या प्रमाणावर मागणी असली तरी अपेक्षित उत्पादन होत नसल्याने आजही जिरेनियमची आयात करावी लागते. पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून माहिती देताना मंगेश महाले यांनी सांगितले, की जिरेनियमसाठी इतर पिकांच्या तुलनेने कमी पाणी लागते. मात्र, त्याच्या चांगल्या वाढीसाठी ठिबक सिंचन करणे गरजेचे आहे. एकदा लागवड केली तर एका वर्षात तीन ते चार वेळा कापणी करता येते. एका एकरात साधारणतः दहा हजार रोपे लावता येतात. योग्य पाणी व खत व्यवस्थापन केल्यानंतर साधारणतः 40 टन बायोमास उत्पादन मिळते. या उत्पादनातून 30 ते 40 किलो तेल उपलब्ध होते. या लागवडीचा खर्च एकरी दहा हजार रोपे या हिशेबानुसार, 60 हजार रुपये येतो. मात्र, तीन वर्षांसाठी एकदाच हा खर्च करावा लागतो. प्रती कापणी 10 ते 15 टन बायोमास मिळाल्यानंतर व एक किलो तेलाची बाजारात मिळणारी किंमत पाहता, एका एकरात साधारणतः साडेतीन ते सव्वा चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न सहज मिळू शकते असे त्यांनी सांगितले. जिरेनियमध्ये आंतरपीक म्हणून शेवगा देखील लागवड करता येते. या पिकाला कोणतेही जनावर तोंड लावत नाही. शिवाय त्याच्यावर कुठल्याही किडरोगाचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे एकदा का खर्च केला तर शाश्वत उत्पन्न हाती मिळते. या वनस्पतीची भारताची गरज ही वर्षाला 200 ते 300 टन आहे. मात्र, सद्यःस्थितीत भारतात वर्षाला केवळ दहा टन देखील ऑईल निर्मिती होत नाही. त्यामुळे या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड केल्यास शेतकर्यांना लाखोंचे उत्पन्न मिळू शकते असे त्यांनी सांगितले. जिरेनियमची लागवड केल्यानंतर बर्याचदा शेतकर्यांना भीती असते, की आईल कसे तयार करणार तर आज एकट्या जळगाव जिल्ह्यात ऑईल काढण्याचे सात ते आठ प्लान्ट झाले असून भविष्यात ही संख्या वाढतच वाढतच जाणार आहे. शिवाय मुंबईत 50 ते 60 खरेदीदार देखील हे ऑईल खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
जिरेनियम तेल काढणीयंत्राला अनुदान ः अनिल भोकरे
कार्यशाळेचा समारोप कृषी विभागाचे कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी शेतकर्यांना मार्गदर्शन करताना शेतीत नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले. जिरेनियमपासून तयार होणार्या तेलाच्या काढणीयंत्राला शासनाकडून अनुदानही दिले जात आहे. इच्छूकांनी यासाठी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहनही श्री. भोकरे यांनी केले. कार्यशाळेत सहभागी शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे डॉ. बेडीस व श्री. महाले यांनी निरसन केले. उपस्थित सर्वांना कार्यशाळेतील सहभागाबद्दल प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. उपसंपादक आनन शिंपी सूत्रसंचालन तर हेमलता जावळे यांनी आभार मानले.