सामान्य नागरिकांच्या अन्न, वस्र, निवारा या प्रमुख गरजांपैकी वस्र हि गरज प्रमुख्याने व अन्न हि गरज काही अंशी भागविण्याची क्षमता कापूस या पिकात आहे. त्यामुळेच जागतिक बाजारपेठेत कापूस या पिकाची चलती आहे. जागतिक व्यापारात कापूस पिकाचे महत्व लक्षात घेता प्रमुख कापुस उत्पादक देशांनी ७ ऑक्टोबर २०१९ हा दिवस जागतिक कापूस दिवस म्हणून साजरा करण्यासाठी World Trade Organisation (WTO) च्या वतीने जिनिव्हा येथे जागतिक कापूस दिवस साजरा करण्यात येत आहे. यासाठी जागतिक प्रमुख कापूस उत्पादक देश (बेनिन, बुर्किना फासो, चाड आणि माली) या चार प्रमुख देशांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत याबाबत आवेदन केले होते त्यानुसार हा दिवस साजरा केला जात आहे.
भारतातर्फे केंद्रीय कापडमंत्री स्मृती इराणी आजपासून जिनिव्हा येथे साजरा होणार्या जागतिक कापूस दिनाच्या पाच दिवसीय कार्यक्रमात भारताचे प्रतिनिधित्व करीत आहेत. या पाच दिवस चालणाऱ्या पूर्ण सत्रात राज्यांचे प्रमुख, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि खासगी क्षेत्रातील अधिकारी उपस्थित राहतील. जागतिक कापूस दिनानिमित्ताने कापसाचे फायदे, नैसर्गिक फायबर म्हणून त्याचे उत्पादन, पिकातील परिवर्तन, व्यापार आणि खप याबाबतच्या समस्या यावर चर्चा होईल. जागतिक कापूस दिनाचा कार्यक्रम जगभरातील कापूस पिकाचे अर्थकारण व त्यासमोरील आव्हानांवर प्रकाश टाकण्यास मदत करेल कारण जगभरात किमान विकसित, विकसनशील आणि विकसनशील या सर्वच देशासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी कापूस हा महत्त्वाचा धागा आहे.
जागतिक कापूस दिवसाच्या निमित्ताने 30 पेक्षा जास्त देश कापूस उत्पादक, निर्यातदार आणि व्यवसायिक संपर्कात येतील आणि 400 पेक्षा जास्त प्रमुख व्यक्ती जगभरातील हजारो लोकांसह जिनिव्हामध्ये कापूस साजरा करणार आहेत.
भारताचा सहभाग
टेक्सप्रोसिल, हँडलूम एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (एचईपीसी), कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) येथे स्टॉल्स लावणार आहेत. याठिकाणी राष्ट्रपितांच्या १५० व्या जयंतीनिमित्त कापसापासून बनविलेले महात्मा गांधींचे शिल्प प्रदर्शित केले जाईल. कॉटन टेक्सटाईल एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (टेक्सप्रोसिल) या प्रदर्शनात भारताची उच्च प्रतीची कापूस वस्त्रे प्रदर्शित करणार आहे.
प्रदर्शनात एचईपीसी भारतातील प्रमुख समूहातून हाताने विणलेल्या वस्तूंचे प्रदर्शन करीत असून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त विणकर पिट्टा रामुलू यांच्या चरख्याचे थेट प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमानंतर चरखा डब्ल्यूटीओला देण्यात येणार आहे. व्यंकटगिरी, चंदेरी, माहेश्वरी आणि इकात साड्या सारख्या भौगोलिक मानांकन/ संकेत देण्यात आलेल्या कपड्यांसह इतर अनेक पारंपारिक भारतीय वस्त्रे आणि सेंद्रिय सूती वस्त्रही येथे प्रदर्शित केले जाणार आहेत. २०११ ते २०१८ दरम्यान भारताने बेनिन, बुर्किना फासो, माली आणि चाड तसेच युगांडा, मलावी आणि नायजेरिया या सात आफ्रिकन देशांसाठी सुमारे २.२ million अमेरिकन डॉलर्सचा कापूस तांत्रिक सहाय्य कार्यक्रम (कॉटन टॅप -१) राबविला आहे.
जागतिक महत्व
कापूस ही एक जागतिक कमोडिटी आहे जी जगभरात निर्माण होते आणि एक टन कापूसामुळे सरासरी पाच जणांना वर्षभर रोजगार उपलब्ध होतो. जगातील कृषी क्षेत्राच्या फक्त २.१ टक्के भूमीचा वापर हा या पिकासाठी केला जात आहे, तरीही जगातील कापडांच्या आवश्यकतेपैकी २७ टक्के गरज याद्वारे भागवली जाते. कापड आणि कपड्यांमध्ये वापरल्या वापरला जाणारा धागा व्यतिरिक्त खाद्यपदार्थ बनविण्यासाठी बियाण्यापासून खाद्यतेल आणि जनावरांचे पशुखाद्य हे सुद्ध
या पिकापासून मिळतात.
कार्यक्रमाचे उद्दीष्टे
* कापूस आणि उत्पादन, परिवर्तन आणि व्यापारातील सर्व भागधारकांना समस्या सोडविणे
* देणगीदार आणि लाभार्थ्यांना यांच्या गुंतवणुकीतून कापूस पिकाचा अजून विकास करणे
* विकसनशील देशांमध्ये कापूस-संबंधित उद्योग आणि उत्पादनासाठी खासगी क्षेत्र आणि गुंतवणूकदारांशी नवीन सहयोग मिळविणे आणि
* तांत्रिक प्रगती तसेच कापसावरील पुढील संशोधन आणि विकासास प्रोत्साहन देणे.