र्होडस गवत
1915 मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात या बहुवर्षायू गवताची आयात करण्यात आली. याचे खोड तारेसारखे असून 90 ते 120 सें.मी.उंची वाढते. खोडाच्या जमिनीत आडव्या वाढणार्या शाखा लांब,मजबूत व पर्णयुक्त असतात. पाने 3.5 मि.मी. रुंद व टोकाकडे निमूळती असतात. चिकण भारी जमीन सोडून इतर कोणत्याही जमिनीवर हे गवत वाढते. भारी चिकण माती व दलदल या गवताला सोसत नाही. ऊबदार,दमट हवामानात व खोलगट भागात याची वाढ चांगली होते. जमिनीतील पुष्कळ लवणता हे सहन करू शकते. हे गवत अवर्षणाचा चांगला प्रतिकार करते आणि थंडीही सहन करू शकते. भारतात बागायती व जिरायती अशा दोन्ही स्वरूपांत या गवताची लागवड करता येते.
र्होडस गवताची लागवड बियांपासून किंवा मुळे फुटलेल्या कांड्यांपासून करतात. जिरायती पिकासाठी हेक्टरी 4.5 ते 8 किलो व बागायतीसाठी 11-13 किलो बी लागते. एका किलोत 7250000 ते 9500000 बिया असतात. बी 2 सेंटिमीटरपेक्षा खोल लावत नाहीत. पृष्ठभागावर बिया फेकून त्यावर माती पसरतात किंवा आच्छादनाचा वापर करतात. एका हेक्टरला मुळे फुटलेली कांडे सुारे 25,000 लागतात. पेरणीपूर्वी 12 ते 20 टन शेणखत हेक्टरी देतात. बी पेरून तयार केलेल्या पिकाची तीन महिन्यानंतर आणि कांडे लावून तयार केलेल्या पिकाची दोन महिन्यांनंतर पहिली कापणी करतात. पुढील कापण्या एक महिन्याच्या अंतराने करतात. उत्तर भारतात दरवर्षी 7-8 कापण्या व दक्षिण भारतात उबदार हवामानामुळे 12 कापण्या मिळतात. पेरणीनंतर किंवा लागणीनंतर कोळपणी करणे आवश्यक असते. जरुरी असेल तर विरळणी करून दोन ठोंबांतील अंतर 45 ते 60 सें.मी. ठेवतात. हंगामाप्रमाणे पिकाला 2-3 आठवड्यांच्या अंतराने पाणी देतात.
बागायती पिकाचे ओल्या चार्याचे वार्षिक हेक्टरी उत्पादन सुारे 37 टन आणि जिरायती पिकाचे सुारे 17.5 टन असते. हे गवत फार झपाट्याने वाढत असल्यामुळे ते शेतात फार दाट होते. यासाठी वर्षातून एकदा नांगरणी करून झाडांची सं‘या मर्यादित ठेवणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे हे गवत एका जागी तीन वर्षे चांगले उत्पादन देते. गवत एक दा प्रस्थापित झाले की गुरांना चरू देऊन फुले येऊ देण्याचे टाळावे. फुले आल्यावर 23 ते 25 दिवसांनी बी पक्व होते. बी काळजीपूर्वक साठवल्यास दोन वर्षे चांगले राहते. झांबियामध्ये र्होडस् गवत स्टायलोबरोबर लावले असता 20% ने वाढले. टेक्सासमध्ये पाणी भरून प्रति हेक्टरी वर्षाला 15,775 कि. वैरण मिळाली. पूर्व आफि‘का, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांतून अल्पमुदतीच्या कुरणात हे गवत लावले जाते. याने मातीचा पोत सुधारतो व सेंद्रीय द्रव्ये वाढतात. दक्षिण आफि‘केत या गवताचा चारा दुभत्या जनावरांसाठी चांगला समजला जातो. कुरणात सप्टेंबरपर्यंत या गवतात गुरे चारून व त्यानंतर गुरे चरण्याचे बंद करून गवत फुलावर येण्यापूर्वी कापणी केल्यास त्यापासून वाळलेले गवत तयार करता येते. गुरे चरताना त्यांच्या पायाखाली ते तुडवले गेले तरी त्याला त्यापासून अपाय होत नाही. र्होडस् गवताबरोबर चवळी, मोहरी, गवार ही चार्याची पिके लावता येतात. लसूणघासाबरोबर हे पीक घेतल्यास चार्याची उपयुक्तता वाढते आणि चार्याचा वर्षभर पुरवठा होतो. उन्हाळ्यात या गवतापासून आणि हिवाळ्यात लसूणघासापासून हिरवा चारा मिळतो. र्होडस् गवत पालेदार असल्याने जनावरे आवडीने खातात. हे पौष्टिक व मोलाचे चार्याचे पीक आहे. हिरव्या चार्यात 3% आणि फुलावर येण्यापूर्वी कापणी करून वाळवलेल्या गवतात 6.4 % प्रथिने असतात. तसेच या पिकास कॅल्शिअम (.5%) व फॉस्फरस (0.4%) समतोल प्रमाणात असतात. घोड्यांसाठी हे गवत योग्य समजत नाहीत. महाराष्ट्रात र्होडस् गवताची फारशी लागवड नाही. पण हे फार पौष्टिक व उत्कृष्ट गवत असल्याने शेतजमिनीवर याची लागवड करता येईल.
पॅरागस,
हे बहुवर्षायू गवत मूळचे बझिलच्या पॅरा प्रांतातील असल्यामुळे त्याला पॅरा गवत म्हणतात. हे दिसावयास भरभरीत असून जमिनीवर वाढणार्या धावर्या खोडापासून याची वाढ झपाट्याने होते. खोडावरील पेरांपासून मुळे व 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त उंचीची सरळ वाढणारी खोडे निघतात. गवत चरबट असले तरी गोड व पौष्टिक आहे. गुरे हे गवत फार आवडीने खातात. दमट उष्ण हवामानात पाणथळ जागी पॅरा गवत चांगले वाढते, 1894 मध्ये श्रीलंकेमधून हे भारतात प्रथम आणले गेले. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटकामधील खोलगट, पाणथळ जागी याची लागवड वाढत आहे. खोलगट भागातील सुपीक जमीन या पिकाला चांगली मानवते. क्षारामुळे अगर दलदल झाल्यामुळे इतर पिकास निरुपयोगी बनलेल्या जमिनीत हे पीक चांगले येते. 4-5 वर्षे हे पीक घेतल्यानंतर जमीन सुधारून इतर पिके घेण्यालायक बनते. फे ब‘ुवारी-मार्चध्ये जमीन नांगरून,कुळवून हेक्टरी 35 ते 45 टन शेणखत घालून तयार करतात. तिच्यामध्ये मे-जूनमध्ये 3-4 डोळे असलेल्या,25-30 सेंटिमीटर लांबीच्या खोडाच्या कांड्या 1 ु 1 मीटर अंतरावर ओळीत जमिनीत खोचून लावतात. हेक्टरी 10-12 हजार कांड्या लागतात. दलदलीच्या जमिनीत मशागत न करताच लागण करतात. जमिनीत लावलेल्या प्रत्येक पेरापासून मुळ्या फुटून गवत वाढीस लागते. कांड्या लावल्याबरोबर पाणी देतात. 100 सें.मी. किंवा त्याहून अधिक पर्जन्यमान असलेल्या भागात गवत चांगले वाढते. पण पाऊस नसेल तेव्हा 5-6 दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी द्यावे लागते. बी लावून लागवड करता येते. 1 से.मी.पेक्षा खोल बी लावू नये. हे गवत पसरून जमीन झाकून टाकते. त्यामुळे त्याच्यात तण वाढत नाही. पाणी दिल्याने जमीन कडक झाल्यास पिकाच्या दोन ओळींमधील जमीन हलक्या नांगराने फोडून मोकळी केल्यास गवताची वाढ चांगली होते.
एकदा लागण केलेले पीक 7-8 वर्षे ठेवतात, लागवडीपासून साधारणपणे अडीच-तीन महिन्यात गवत 1-1। मीटर उंच झाल्यावर पहिली कापणी करतात. पुढे महिन्याने एक याप्रमाणे कापणी करतात. गवत कोवळे असतानाच कापावे लागते. मुंबईजवळील आरेगवळीवाड्यात सुारे 200 हेक्टरवर दलदलीच्या जमिनीत हे पीक घेतले आहे. तेथील 16-17 हजार दुभत्या जनावरांचे गोठे धुतलेले पाणी या क्षेत्रात सोडले जाते. त्यामुळे हेक्टरी 250 टनांपर्यंत हिरवे गवत वर्षाला मिळते. पुरेसे खत व जमिनीत ओल असल्याने उन्हाळ्यापर्यंत गवत हिरवे राहते व गुरांना तेव्हा हिरवा चारा मिळतो. पॅरा गवताबरोबर लसूणघास, बरसीम, चवळी ह्या शिंबीवर्गीय चार्याच्या वनस्पती लावता येतात. एका हेक्टरमधून 20 ते 25 किलो बी मिळते. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीवर हेक्टरी तीन किंवा अधिक गुरे चारता येतात. पाणी दिल्याने वर्षाला हेक्टरी 98 टनांच्या आसपास हिरवा चारा साधारणपणे मिळतो. कीटकांचा व रोगांचा उपद्रव या पिकाला होत नाही. वाढीच्या कोणत्याही अवस्थेत पॅरागवत जनावरे आवडीने खातात. महाराष्ट्रात बर्याच जागी दलदलीचे व दमट हवामानाचे क्षेत्र आहे. तेथे हे गवत लावल्यास पौष्टिक हिरवी वैरण गुराढोरांना मिळेल व नापीक जमीन उपयोगात आणता येईल.