पशुपालन व्यवसाय यशस्वी होण्यासाठी संसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध करणे अत्यंत गरजेचे असते. जनावरांना वेगवेगळे जिवाणू आणि विषाणूजन्य आजार होतात. या आजारामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. जनावरांची मरतूक होते त्यांची उत्पादनक्षमता खालावते. तसेच आजारी जनावरांच्या औषोधोपचारावर खर्च वाढतो त्यामुळे पशुपालकांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होते.
गाई, म्हशी, शेळ्या-मेंढ्या, कोंबड्या काहीवेळा साथींच्या रोगामुळे तडकाफडकी मरतात. रोगांची लागण झाल्यानंतर उपचार करण्यास वेळ मिळत नाही. परिणामी, किमती जनावरे दगावल्याने पशुपालकांचे नुकसान होते. हे लक्षात घेऊन नियमितपणे साथीच्या रोगनियंत्रणासाठी लसीकरण करावे.
पशुपालक पैसे खर्च करून लसीकरण करू शकत नाहीत. त्यामुळे शासनाच्या मार्फत पशुसंवर्धन विभागाला औषध व लस पुरवठा केला जातो. त्यांनंतर पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुधन विकास अधिकारी गावात जाऊन जनावरांना लस देतात.
लसीकरण करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी
- लसीकरण करण्यापूर्वी एक आठवडा अगोदर आंतरपरजीवीच्या नियंत्रणासाठी जनावराला जंतनाशक पाजावे.
- जनावराच्या शरीरावरील बाह्यपरोपजीवीच्या (उदा. गोचीड, गोमाशी, उवा, लिखा, पिसवा) प्रभावी नियंत्रणासाठी शिफारशीनुसार औषधाची फवारणी करून घ्यावी.
लसीकरण करताना घ्यावयाची काळजी
- जनावरांना दिली जाणारी लस ही चांगल्या कंपनीची असावी.
- लस खरेदी करताना त्यावरील औषध कालबाह्य होण्याची तारीख पाहून घ्यावी. लसीचा बॅच नंबर नोंदवून ठेवावा.
- काही लसी (उदा. खुरी, श्वानदंश, धनुर्वात) औषधी दुकानातून आणताना थर्मासमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीत बर्फात ठेवून आणाव्यात. जनावरांना लस देईपर्यंत त्या बर्फातच ठेवाव्यात. बाहेर काढून ठेवू नयेत.
- लस घरी आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवावी किंवा लस बाजारातून आणल्याबरोबर लगेच वापरून टाकावी.
- निरोगी जनावरांनाच लसीकरण करावे.
- लसीकरण शक्यतो थंड वेळेत म्हणजे सकाळी किंवा सायंकाळी करावे.
- लसीकरण करताना सुई प्रत्येक वेळी पाण्यात उकळून निर्जंतुक करून घ्यावी.
- फोडलेल्या बाटलीतील लस तशीच साठवून पुन्हा वापरू नये.
- लस योग्य मात्रेत व योग्य मार्गाने द्यावी.
- शक्यतो एकाच दिवशी एका गावातील सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.
लसीकरणानंतर घ्यावयाची काळजी
- बैलांना लसीकरणानंतर एक आठवडा हलके काम द्यावे. जेणेकरून शरीरावर ताण पडणार नाही.
- उत्तम रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होण्यासाठी चांगला आहार द्यावा.
- लसीकरणानंतर जनावरांचे अतिउष्ण व अतिथंड वातावरणापासून संरक्षण करावे, तसेच लांबवर वाहतूक करू नये.
- लसीकरणानंतर ताप येणे अथवा जनावरांना काही अपाय घडू शकतात. मात्र, ते तात्पुरते व सौम्य स्वरूपाचेच असतात.
रोगाची साथ आल्यानंतर परिसरातील इतर गावातील जनावरांचे आधी लसीकरण करून घ्यावे, नंतर त्या गावाच्या जवळील, गावातील जनावरांचे लसीकरण करावे. शेवटी रोगाची साथ आलेल्या गावात लसीकरण करून घ्यावे. यामुळे रोगाची साथ नियंत्रणात येईल व दूरवर साथ पसरणार नाही.
जनावरांमध्ये खालील आजारांच्या लसी देणे आवश्यक आहे.
- गाई-म्हशी – घटसर्प, फऱ्या, लाळ्या-खुरकूत
- शेळ्या-मेंढ्या – घटसर्प, आंत्रविषार, फऱ्या, लाळ्या-खुरकूत, देवी, पीपीआर
- श्वसनातील रोगनियंत्रण, पारव्हौ व्हायरस, डिस्टेंपर, हिपॅटायटीस, लेप्टोस्पायरोसिस व रेबीजसाठीही लसी उपलब्ध आहेत.
लसीकरणाविषयी काही महत्वाच्या गोष्टी
- लस दिल्यानंतर काही जनावरांत मानेवर गाठी येतात. गाठीमुळे प्राण्यांचा जीव धोक्यात येत नाही. लस दिल्यानंतर त्या जागेवर हलके चोळल्यास गाठ येण्याचे प्रमाण कमी होते. कोमट पाण्याने शेकले तरी गाठ जिरून जाते.
- लसीकरणामुळे जनावरे गाभडत नाहीत. मात्र, अशक्त जनावरांत अगदी क्वचितच असा प्रकार घडू शकतो. लस दिल्यामुळेच असे होते असे नाही. त्यामुळे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना लस देऊन घ्यावी .
- लसीकरणामुळे शरीरावर येणारा ताण किंवा तापामुळे दूध कमी होऊ शकते. परंतु ते तात्पुरते असते.
- जनावरांना रोग होण्याची वाट न पाहता अगोदरच लसीकरण करावे. कारण लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती येण्यास दोन ते तीन आठवडे लागतात. त्यामुळे रोगाची साथ येण्यापूर्वी जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असते.
लसीकरण केल्यानंतरही जनावरांमध्ये रोग होऊ शकतो त्याची वेगवेगळी कारणे आहेत. जसे
– लसीची मात्रा योग्य प्रमाणात न दिल्यामुळे.
– लसीची साठवणूक योग्य पद्धतीने न केल्यामुळे.
– लसीकरणात अनियमितता असणे.
– लसीची मुदत संपल्यानंतर किंवा उरलेली लस वापरल्यामुळे.
– जनावरांना आंतर व बाह्य परोपजीवीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे.
– लस देतेवेळी जनावर अशक्त किंवा आजारी असणे.
– त्याच रोगाच्या लसीला प्रतिकारक असणाऱ्या विषाणूंच्या जाती व उपजाती सोडून दुसऱ्या प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव होणे.
– लस देताना जर जनावरांच्या शरीरात जीवाणू/ विषाणूचा प्रादुर्भाव असेल, परंतु अजूनपर्यंत रोगाची लक्षण नसली, तरी अशा जनावरास लस दिल्यानंतर रोग जोमाने होतो.
डॉ . वर्षा देविदास थोरात
सहाय्यक प्राध्यापक
सूक्ष्मजीवशास्त्र विभाग
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय
मुंबई –१२
ई–मेल– [email protected]
डॉ. मनोजकुमार आवारे
विभाग प्रमुख, पशु पोषण व पशुआहार शास्त्र
बायफ रिसर्च फौंडेशन, उरुळी कांचन, पुणे.