प्रतिनिधी/जळगांव
सऱ्याला आपट्यांची पानं सोनं म्हणून वाटणारा हा भाबडा शेतकरी खरंच एक दिवस शेतात असं सोनं पिकवतो की जे बाजारात मिळणाऱ्या सोन्याच्या शतपट त्याला समाधान देत व ज्याचा हिशोब तोळ्यात होत नाही. शेती क्षेत्रांत दररोज नव नवीन तंत्रज्ञानाचा विकास होत आहे. त्याप्रमाणे बरेच शेतकरी आपली शेती कसत आहे आणि उत्पन्नाचे नवनवीन आलेख उंचावत आहेत असेच एक शेतकरी आहे कुसुंबे ता. चोपडा येथील प्रगतीशील व प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर पाटील.
कष्ट करण्याची तयारी, नियोजनबद्ध काम व जिद्दी वृत्ती असल्यास अशक्य असे काहीच नाही हरभऱ्याची शेती परवडत नाही. असा नकारात्मक विचार करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे कुसुंबे, ता.-चोपडा, जि- जळगाव, येथील ज्ञानेश्वर पाटील यांनी हरभऱ्याचे भरघोस उत्पन्न घेऊन आदर्श निर्माण केला आहे. श्री. ज्ञानेश्वर जोगील पाटील (नाना) यांनी ४ एकरात ५४ क्विंटल हरभऱ्याचे उत्पादन घेऊन आपल्या शेतीतील वेगळेपणा सिद्ध केला आहे.
शेती उद्योग म्हणजे तोट्यातील उद्योग केवळ राबवनुकीचे पैसे मिळतात, असा शेतकऱ्याचा समज आहे आणि थोड्याप्रमाणात खराही आहे. चाकोरीबद्ध पारंपारिक शेती, निसर्गाचे चमत्कारिक बदल व इतरही काही कारणामुळे असे होत असले तरी पाटील यांनी पारंपारिक चाकोरी सोडून आधुनिक विचार व साधनांनी शेती करत आहे आणि त्यांचे यश त्यांना मिळत आहे.
१० वी चे शिक्षण घेत असतांनाच शिक्षण सोडून त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला त्या वेळी त्यांच्याकडे वडलोपार्जित ९.६ एकर क्षेत्र होते ते सांभाळून येणाऱ्या उत्पनातून तीन मुलांचा शिक्षणाचा खर्च केला. त्यानंतर त्यांनी टप्याटप्याने १२.८ एकर क्षेत्र खरेदी केली आज त्यांच्याकडे एकूण २२.४ एकर एवढे बागायती क्षेत्र आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून नाना केळी उत्पादन करत आहे मुख्यतः ते केळी उत्पादक आहे, पण केळी उत्पादन करत असतांना त्यांचा कल हा नेहमी पिकांच्या फेरपालट वर असतो. त्यामुळे ते केळीचे पिक काढल्यानंतर रब्बी हंगामात हरभरा आणि गव्हाची पेरणी करतात यामध्ये त्यांचा भर हा हरभरा पेरणीवर असतो कारण हरबरा पिक हे द्विदलवर्गीय गटात मोडत असल्याने त्याचा नत्र स्थिरीकरणासाठी महत्त्वाची भूमिका पार पडतो.
नियोजनबद्ध शेती न करणाऱ्या आधुनिक शेतकऱ्यांना नाना यांनी कष्टातून पिकवलेला हरभरा आदर्शवत आहे. कष्ट व नियोजनबद्ध शेती केल्यास अशक्य काहीच नाही असे ते सांगतात. नानांनी पुढील पद्धतीने हरभरा पिकाचे नियोजन केले होते.
पेरणी-
रब्बी हंगामात दि.११ नोव्हेंबर २०१९ रोजी ४ एकरात पीकेव्ही-२ या हरभरच्या वाणाची ६० किलो बियाण्याची बैलगाडीच्या च्या सहय्याने मशागत करून पेरणी केली.
खत व्यवस्थापन-
पेरणी नंतर १०:२६:२६ (३००किलो) प्रती चार एकर टाकले. पिक फुलवरयात असतांना १९:१९:१९ (सुजला-आर.सी.एफ) १ किलो प्रती २०० लिटर पाण्यात फवारणी केली. सुजला ची फवारणी केल्यामुळे फुला चे रुपांतर घाट्यात लवकर होण्यात मदत झाल्याचे नानांनी सांगितले.
पिक संरक्षण
रोग नियंत्रण –
हरभरा पिकाचे प्रामुख्याने मररोगामुळे आर्थिक नुकसान होत असते, परंतु पीकेव्ही-२ हि वाण
मररोग प्रतिकारक्षम असल्यामुळे मर रोगासाठी विरोधात पिक संरक्षण करायची गरज पडली नाही.
कीड नियंत्रण-
या पिकामध्ये घाटे अळीमुळे जवळ-जवळ ३० ते ४० टक्के नुकसान होते. या किडीचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने चांगले होते. त्यासाठी पेरणीच्या वेळी ३०० ग्रँम ज्वारी, शेतामध्ये पेरली या पिकाचा मित्रकिडींच्या आकर्षणासाठी उपयोग होतो. त्यामुळे घाटे अळी नियंत्रण होण्यास मदत झाली.
लागवडी नंतर साधारतः ३०-३५ दिवसांनी बारीक अळ्या दिसू लागल्या आणि शेंडे ही खालेल्ले दिसत होते त्यावेळेस घाटे अळीच्या रासायनिक पद्धतीने नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट ५ टक्के दाणेदार २२० ग्रँम आणि लँम्डासायलोथ्रीन ५ टक्के प्रवाही ५०० मिली प्रती ५०० लिटर पाण्यात चार वेळेस आलटून पालटून फवारणी केली.
पिकाची काढणी-
हरभरा पिकाची काढणी १५ मार्च रोजी करून स्थानिक व्यापार्याला ४५२५ रु. प्रती क्विंटल या दराने दिले.
शेती करत असताना नानांचे कटाक्ष खालील गोष्टींवर असते
रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड.
बिजप्रक्रिया.
रासायनिक खतांचा संतुलित वापर.
सेंद्रिय कर्ब हा नियंत्रित राहण्यासाठी चांगल्या कुजलेल्या शेणखत तसेच पिकांच्या आवशेष चा वापर.
पिकांच्या वाढीनुसार व गरजेनुसार पाण्याचा योग्य वापर.
१०० टक्के क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली असल्यामुळे जमिनीला पाणी न देता पिकला पाणी दिले जाते.
पिकांची फेरपालट.
युवा शेतकऱ्यांना नानाचा संदेश :
युवा शेतकर्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार तसेच पारंपारिक शेती न करता आधुनिक शेती करावी.
श्री. ज्ञानेश्वर जोगील पाटील
३२४, जोगी कृपा, मु-कुसुंबे, पो-घोडगाव,
ता.-चोपडा, जि- जळगाव, पिन-४२५१०८,
मोब- ९७६५०४४०५१/८६६९७०८६२२