दुष्काळ ठरला ग्रामविकासाला प्रेरक
दुष्काळ आणि मराठवाडा याचे सख्य सर्वदूर माहितीच आहे. वाघलखेडही त्याला अपवाद नव्हते. सलग पाच-सहा वर्षाचा दुष्काळ संकट न ठरता वाघलखेडच्या गावकऱ्यांसाठी स्वयंपूर्णतेकडे नेणारा ठरला. पिण्याच्या पाण्यासाठी दररोज टॅकरची वाट पाहणारं हे गाव आज पाण्यासाठी तर स्वयंपूर्ण झालेच आहे, शिवाय विविध उपक्रम राबवू लागले आहे. गायींचे संवर्धन, जलसंवर्धन, आरोग्य, ग्रामस्वच्छता, स्वयंरोजगार, शिक्षण, वाचनालय, महिला सबलीकरण असे उपक्रम गावकऱ्यांनी हाती घेतले आहेत आणि याच पद्धतीने त्यांनी आपला ग्रामविकासातून महिला सबलीकरणाचा वाघलखेडे पॅटर्न यशस्वी केला आहे.
पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यापासून ग्रामविकासाची पायाभरणी झाली आणि आज मसाले तयार करणे, रंग बनविणे, उटणे तयार करणे, डाळी तयार करणे असे उद्योग सुरु करून महिला व तरुणांच्या पुढाकारातून आता गाव स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने पाउल टाकले गेले आहे.
वाघलखेडा,ता.अंबड,जिल्हा जालना हे ९०० लोकवस्तीचे, डोंगराच्या पायथ्याशी वसलेले मराठवाड्यातील लहानशे गाव. १२५० एकर इतकेच गावाचे जमिनीचे क्षेत्रफळ. शेती हाच गावकऱ्यांचा प्रमुख व्यवसाय. दुष्काळ आणि मराठवाडा याचे सख्य सर्वदूर माहितीच आहे. हे गावही त्याला अपवाद नव्हते. २०१२ चा दुष्काळ मात्र फारच भिषण होता. गावच्या विहिरी, बोअर, जलश्रोत आटले . पिण्याच्या पाण्यासाठी गावाचे हाल होऊ लागले. शासनाचा पाण्याचा टॅकर हाच एकमेव मार्ग उरला. पण टॅकर हा काही यावरचा कायमस्वरूपी उपाय नव्हता. त्यावेळी गावातील राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे कार्यकर्ते पुढे सरसावले. संघाच्या ग्रामविकास विभागाचे प्रमुख विनयजी कानडे यांनी लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात करणाऱ्या काही गावांबाबत माहिती सांगितली. वाघलखेडा गावातही जलसंधारणाची अशी कामे घेता येतील असे त्यांनी सुचविले आणि गावकरी त्यासाठी तात्काळ पुढे आले.
नाला खोलीकारणासाठी गाव झाले संगठीत:
किसनकाका राऊत यांच्या पुढाकारात गावकऱ्यांनी ग्रामसभा घेत शिरपूर तालुक्यात सुरेश खानापूरकर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या जलसंधारणाच्या शिरपूर पॅटर्नचा पाहणी दौरा आयोजित केला. गावातून गेलेले २५-३० गावकरी ते काम पाहून गावकरी प्रभावित झाले. गावी आल्यावर त्यांनी याच पद्धतीने गावाच्या अवतीभवतीच्या नाल्यांचे खोलीकरण करण्याचा संकल्प सोडला. त्याना सुरेश खानापूरकर यांनी वाघालखेड्यात येऊन मार्गदर्शन केल्यानंतर लोकसहभागातून खोलीकरण करण्याचा निर्णय झाला.
गावातील तरुण व जेष्ठांची एक ग्राम समिती गावातील विविध विकास कामे राबविण्यासाठी स्थापन झाली होती. या समितीच्या माध्यमातून लोकसहभाग निधी संकलित करायला प्रारंभ केला. एकरी ३०० रुपये किंवा यथाशक्ती देणगी गोळा होऊ लागली. सुमारे १ लाख ४० हजार रुपये गावातून गोळा झाले. यावेळी पुन्हा संघाचे ग्रामविकास देवगिरी विभाग प्रमुख विनय कानडे सहकार्यास पुढे आले. त्यांच्या प्रयत्नातून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘ सायबेज आशा’ ह्या संस्थेने आपल्या सीएसआर फंडातून निधी देण्याचे निश्चित केले. त्यासाठी कंपनीचे सीएसआर प्रमुख श्री महामुनी यांनी फंड मिळवून देण्यासाठी मदत केली. त्यातून गाव शिवारातील नाल्यांचे ३ किमी लांब, ३५ फुट रुंद व १५ फुट खोल इतके खोलीकरण करण्यात आले. २७ दिवसापर्यंत चाललेल्या या कामात गाव तनमनधन पूर्वक सहभागी झाले. त्यासाठी सुमारे ९ लाख रुपये खर्च आला. ‘सायबेज आशा’ कंपनीने ७ लाख ६० हजार रुपये उपलब्ध करून दिले.
ग्राम विकासाला मिळाली चालना:
खोलीकरणामुळे पावसाळ्यात पाणीसाठा झाला व गावाला पाणी टंचाई दूर होण्यास मदत झाली. आपण ठरविले तर गावात बदल होऊ शकतो हा विश्वास या कामामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झाल्याने त्यातून विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला.
स्री शक्ती लागली कामाला:
वाघलखेड्यात ग्रामविकासाबाबत महिला वर्ग फारच लवकर जागृत झाला. शेती आणि शेतमजुरी हेच रोजगाराचे प्रमुख साधन असले तरी ते काही शाश्वत रोजगाराचे साधन नव्हते. त्यासाठी ग्रामसमितीने विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला. गट तयार करून महिला त्यासाठी एकत्र येऊ लागल्या.
उटणे व नैसर्गिक रंग निर्मितीस प्रारंभ:
दिवाळीच्या सुमारास उटण्यास भरपूर मागणी असते हे लक्षात घेऊन उटणे निर्मितीस प्रारंभ केला. त्यासाठी औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. त्यांनी नागरमोथा, बाउची, कचोरा, कपूरकाच्छली, ब्राह्मी व मुलतानी माती रास्त दारात उपलब्ध करून दिली. उटणे तयार कसे करावे याचे प्रशिक्षणही महिलांना देण्यात आले. पहिल्या वर्षी फारशा महिला उत्सुक नव्हत्या, परन्तु दुसऱ्या वर्षी गावातील महिलांमध्ये या उद्योगाबद्दल जागरुकता आली आणि महिला स्वत: हिरीरीने पुढाकार घेऊ लागल्या.
उटणे निर्मित्तीसोबतच होळीच्या सुमारास पर्यावरण पूरक नैसर्गिक रंग तयार करायला सुरुवात झाली. त्याचेही प्रशिक्षण महिलांना मिळाले. त्यासाठी लागणारा स्टार्च, आईस्क्रीम मध्ये वापरले जाणारे रंग किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्यात आले. त्यापासून मोठ्या प्रमाणात रंग तयार करण्यात आले.
महिलांनी गटाने एकत्र येऊन ही उत्पादने तयार करून विक्री देखील केली. त्यासाठी, अंबड,जालना व औरंगाबाद येथील ग्राहकांपर्यंत ग्रामविकास कार्यकर्ते व महिला थेट पोहोचल्या.
स्वामी विवेकानंद अभ्यासिका:
शेतकरी कुटुंबातील पालकांचे शाळेत शिकणाऱ्या मुलांकडे शिक्षणाच्या बाबतीत फारसे लक्ष नसते. हा मुद्दा ग्राम समितीने गांभीर्याने घेत गावात स्वामी विवेकानंद अभ्यासिका सुरु केली. भारत नागरे यांनी अभ्यासिकेची जबादारी घेतली. शाळा सुटली कि विद्यार्थी आता अभ्यासिकेत येतात व अभ्यास करू लागतात. अभ्यासिकेच्या उभारणीत रोटरी क्लब जालना यांनी सहकार्य केले. त्यांनी लॅपटोप उपलब्ध करून दिला, रंगरंगोटी व सजावट करून दिली. परिणामी अभ्यासिकेत उत्साहवर्धक वातावरण तयार झाले.
विषमुक्त भाजीपाला उत्पादन:
किमान आपल्या कुटुंबाच्या गरजेइतका तरी विषमुक्त भाजीपाला उत्पादन करण्याचा निर्णय येथील काही शेतकरी कुटुंबातील महिलांनी घेतला. फक्त सेंद्रिय खतांचा वापर करून ते हा भाजीपाला घेतात. घरासाठी आवश्यक तेवढा ठेऊन उरलेला विकून त्यांना आर्थिक फायदाही झाला आहे. अशा पद्धतीने सेंद्रिय उत्पादन घेण्याकडे आता येथील शेतकऱ्यांचा कल वाढणार असे दिसू लागले आहे.
मासिक गावस्वच्छता:
महिन्यातून एकदा संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात येते. त्यात महिला व पुरुष सहभागी होतात. वृक्षलागवड, गटार सफाई, हागणदारी मुक्त गाव अशी वाघलखेड्याची आता ओळख झाली आहे. वेळोवेळी गावात आरोग्य शिबीर घेण्यात येते. याशिवाय वर्षभर विविध उपक्रम गावकरी एकत्रित येऊन राबवीत असतात.
प्रतिक्रिया
लोकसहभागातून गावाचा विकास साध्य करता येऊ शकतो हे आम्ही २०१२ पासून अनुभवत आहोत. शिक्षण, आरोग्य,स्वच्छता व स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग कुटुंबाच्या व गावाच्या उन्नत्तीस कारणीभूत ठरतो. गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन असे लहान लहान उपक्रम राबवीत आम्ही गावाचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत.
- किसन राऊत,वाघालखेडा ता. अंबड, जि जालना. मो.न.९४२१६४८८५९,८३२९७०११०९
स्टोरी आऊटलूक:
- लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून ग्रामविकास.
- नालाखोलीकरण करून पाणीटंचाईवर केली मात.
- नैसर्गिक रंग व उटणे निर्मितीतून महिला सबलीकरण.
- मासिक ग्रामस्वच्छता दिनी गाव स्वच्छ.
- अभ्यासिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक जागृती.