पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना दि. 7 मार्च 1960 रोजी झाली. मामासाहेब मोहोळ, आप्पासाहेब बांदल, वामनराव घारे इ. नेत्यांनी खेड्यातील जनतेच्या विकासाचा ध्यास घेऊन दूध संकलनासाठी दूध संघाची मुहुर्तमेढ रोवली. बारामती व इंदापूर तालुके वगळता जिल्ह्यातील 11 तालुक्यांत पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे कार्यक्षेत्र आहे. संघाने यावर्षी 61 व्या वर्षात पदार्पण केलेले आहे. त्या अनुशांगाने संघाच्या वाटचालीचा घेतलेला मागोवा….!
दररोज दोन लाख लिटरहून अधिक दुध संकलन
एकूण 8 दूध शितकरण केंद्र व 135 बल्क मिल्क कुलर्स असलेल्या दुध संघाची कात्रज येथे सुसज्ज व आधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज डेअरी आहे. संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांना विविध सेवा-सुविधा पुरवित असून त्यामध्ये ए.आय. सुविधा, इंपोर्टेड सिमेन डोसेस, जनावरांसाठी रास्त दरात औषधे, संतुलीत पशुखाद्य, गोचिड व जंत निर्मुलन उपचार, मिनरल मिक्श्चर, चारा, बी-बियाणे, कडबा कुट्टी मशिन, मिल्किंग मशिन, एस.एस.कॅन्स व किटल्या इ. चा पुरवठा केला जातो. दूध उत्पादकांना वेळीच पैसे मिळावेत यासाठी ठरवलेले वेळापत्रक कटाक्षाने पाळले जाते. सध्या 865 दूध संस्थांच्या मार्फत दररोज सुमारे 2 लाख 13 हजार लिटर दूधसंकलन केले जाते.
आयएसओ 22000:2005 व 14001:2015 डेअरी
दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर, ग्राहकांना रास्त दरात दूध विक्री हे संघाचे धोरण आहे. त्यासाठी वीज व इंधन खर्चात बचत, दूध वहातुकीचे नियोजन, किमान मनुष्यबळाचा वापर, प्लांटचे ऑटोमेशन, पाण्याचा पुनर्वापर याकडेही संघ लक्ष देतो. कात्रज डेअरीने आयएसओ 22000:2005 व 14001:2015 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन मिळवले आहे. संघास चार वर्षापासून सतत महाराष्ट्र शासनाच्या पारंपारिक ऊर्जा खात्याकडून ऊर्जा बचतीची पारितोषिके मिळली आहे. एन.डी.डी.बी.चे दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या गुणवत्तेबाबतचे क्वालिटी मार्क मानांकन मिळवणारा व क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांचेकडून वॉश (वर्क प्लेस असेसमेंट फॉर सेफ्टी अॅण्ड हायजिन) मानांकन मिळविणारा पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ हा महाराष्ट्रातील पहिलाच दूध संघ आहे. तूपाच्या शुध्दतेसाठी अॅगमार्कचे देखील मानांकन मिळालेले आहे. कात्रज दुग्धालयात अद्ययावत प्रयोगशाळा असून ग्राहकांना स्वच्छ व भेसळरहित दूध उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी संकलित केलेल्या दुधाच्या तसेच दूग्धजन्य पदार्थांच्या तपासण्या केल्या जातात. कात्रज दुग्धालयामध्ये मिल्क क्लॅरिफायर, होमोजिनायझर, पाश्चराइझर यासारख्या अत्याधुनिक मशिनरींचा वापर करून दुधावर प्रक्रिया केली जाते.
कोरोना कालावधीत अविरत सेवा
ग्राहकाच्या पसंतीनुसार संघाने प्रक्रिया दूधाचे वेगवेगळे प्रकार बाजारात आणलेले आहेत. यामध्ये टोण्ड दूध, डबल टोण्ड दूध, प्रमाणित दूध व मलई दूध इ.चा समावेश आहे. प्रक्रिया केलेल्या दूधाबरोबरच संघ दुग्धजन्य पदार्थांची देखील विक्री करत आहे. सध्याचे युग हे धावपळीचे असल्यामुळे तसेच ग्राहकांची पसंत लक्षात घेऊन संघाने विविध दुग्धजन्य पदार्थांचे उत्पादन व विक्री सुरु केलेली आहे. यामध्ये पाश्चराईज्ड फ्लेवर्डमिल्क (तीन फ्लेवरस् ), स्टरिलाईज्ड फ्लेवर्ड मिल्क (सहा फ्लेवर्स), लस्सी (दोन फ्लेवर्स), ताक ( दोन फ्लेवर्स ), दही ( पॅकमध्ये ), कपातील दही, श्रीखंड, आम्रखंड, मलई पनीर, लोफॅट पनीर, खवा, पेढा, अंबा बर्फी, बासुंदी, पाश्चराईज्ड्क्रिम, गाय तूप, म्हैस तूप, टेबल बटर, आईसक्रिम ( नऊ फ्लेवर्स) इ. दुग्धजन्य पदार्थांची विक्री संघ करीत आहे. संघाने मावा बर्फी, मलई बर्फी, काजूकतली, अंजीर बर्फी चार प्रकारांमध्ये कात्रज मिठाई बाजारात आणलेली आहे. तसेच कात्रज अॅक्वा या नावाने संघ बाटली बंद पाण्याची विक्री करीत आहे.
जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये देखील संघाचे काम अविरतपणे चालू आहे. याकाळामध्ये संघ कर्मचा-यां सोबतच ग्राहकांची देखील विशेष काळजी घेत आहे. शासनाने वेळोवेळी घोषित केलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये संघाने ग्राहकांना घरपोच सेवा दिलेली आहे. याकाळामध्ये संघामध्ये दूध/दूग्धजन्य पदार्थ उत्पादन करतांना विशेष काळजी घेतली जात आहे. यामध्ये सर्व कर्मचारी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतात. डेअरी मध्ये प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीचे शरीराचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासली जाते. सर्वांना निर्जंतुकीकरण कक्षातूनच प्रवेश दिला जातो. तसेच संघाच्या आवारामध्ये येणा-या प्रत्येक वाहनावर निर्जंतुक द्रव्याची फवारणी केली जाते. संघाने वेळोवेळो येणा-या नैसर्गिक आपत्तीवर मात करुन दूध उत्पादक व ग्राहक यांचेसाठी अविरत कामकाज केले आहे व करत आहे.
संघाची वार्षिक उलाढाल 250 ते 300 कोटींच्या घरात आहे. सहकारी तत्वावर चालणा-या या उद्योगाचा पसारा वाढत चालला आहे आणि कात्रज ब्रँड राज्यामध्ये नावारुपाला आलेला आहे. संघाच्या या विस्तारित कामकाजामुळे केवळ हजारो कर्मचा-यांना काम मिळाले नाही तर पुणे जिल्ह्यातील शेतक-यांना दूधाचा चांगला भाव मिळून त्यांच्या जगण्याचा दर्जा वाढण्यास मदत होत आहे.
सहकाराला कार्पोरेट क्षेत्रासोबत सतत स्पर्धा करावी लागत आहे. खालील कारणामुळे सहकार क्षेत्र नेहमीच कार्पोरेट क्षेत्रापेक्षा सर्वच बाबतीत मागे राहिलेले आहे.
सहकारी संघांचे कमकुवत जाळे : गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक संघाची स्थापना करून राज्यातील सर्व सहकारी संस्थांचा एकच ब्रँड तयार करण्याची गरज आहे. हे काम अवघड आहे पण अशक्य नाही. सहकारी संघांच्या बरोबरीने खाजगी संस्थांचे पाऊल मोठे झाले आहे. शासन, संघ व खाजगी संस्थांचा मेळ घालून दूधाच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र मंडळ स्थापन करण्याची गरज आहे. सध्या सर्वजण एकमेकांची पुनरावत्ती म्हणजेच ‘डुप्लिकेशन ऑफ वर्क’ करत आहेत. ज्याची जी गुणवत्ता चांगली आहे त्यांनी ती जबाबदारी घ्यावी यामुळे सर्वच संघांचा व पर्यायाने शेतक-यांचा फायदा होईल. आज सर्वांची तोंडे वेगवेगळ्या दिशांना आहेत याचा तोटा सर्वांनाच सहन करावा लागत असून राज्यातील बाजारपेठेतही झगडावे लागत आहे.
सातत्यपूर्ण दूध उत्पादनासाठी प्रयत्न : दर्जेदार जनावरांची निर्मिती हा दूग्धव्यवसायातील महत्वाचा भाग आहे. देश दूध उत्पादनात जगात वरच्या क्रमांकावर आहे. पण प्रति जनावर उत्पादकता अजूनही खूप कमी आहे. दर्जेदार जनावरांपासून सातत्यपूर्ण उत्पादन मिळवणे हेही मोठे आव्हान आहे. जनावरांची निगा राखणे, ती रोगमुक्त ठेवणे महत्वाचे आहे. आपल्याकडे बहुतांश गोठे अस्वच्छ असतात. परिणामी जंत व गोचिड यांच्यामुळे दूध उत्पादनात 30 ते 35 % घट होते. चुकीची गोठा पद्धत हा देखील मोठा अडथळा आहे. आधुनिक दूध उत्पादनात मुक्त संचार पद्धतीचे गोठे अतिशय गरजेचे व महत्वाचे आहेत. यासाठीचे प्रशिक्षण शेतक-यांना देणे गरजेचे आहे. पशु आहारच्या बाबतीत जागृती करणे आवश्यक आहे.
शासनाकडून अपेक्षा : दूध उद्योग हा शेती व्यवसायाचाच भाग गृहित धरून त्यासाठी शेतीसाठीच्या दराने वीज उपलब्ध करुन द्यावे. दूध / दूग्धजन्य पदार्थांचा दरडोई वापर वाढण्यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. शालेय पोषण आहारात दूध / दूग्धजन्य पदार्थ देण्याची आवश्यकता आहे. याचा फायदा थेटपणे शेतक-यांना होईल. गेल्या काही वर्षात पशुखाद्य, मजूरी आदी सर्व बाबींचे दर वाढल्याने उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. शेतकरी दुध व्यवसायातून बाहेर पडत आहेत. नवी पिढी या व्यवसायामध्ये येण्यास फारशी उत्सुक नाही. यामुळे छोट्या प्रमाणातील या व्यवसायाला थोडे मोठे स्वरूप देण्यासाठी शासनाने शेतक-यांना भरीव पाठबळ देण्याची गरज आहे
मार्केटिंग : सरकारने चहा हे राष्ट्रीय पेय घोषित केलेले आहे. खरं तर चहाचे मळे हे फक्त मोजक्याच लोकांच्या मालकीचे आहेत, सामान्य शेतक-यांच्या नव्हे. निरनिराळ्या शीत पेयांचा प्रचार जाहिरात क्षेत्रातील प्रत्येक माध्यमाकडून (टि.व्ही/वर्तमानपत्र/जाहिरात फलक) केला जातो. दूधाचा देखील प्रचार याच प्रमाणात झाला पाहिजे. राष्ट्रीय अंडी समन्वय समिती एन ई सी सी याचप्रमाणे प्रचार करते. ती सहकारी, सरकारी किंवा खाजगी कोणत्याही क्षेत्राकडून येणा-या अंड्यांच्या बाबतीत प्रचार करतांना ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ अशी केली जाते. याउलट दूधाच्या जाहिरातीमध्ये असा संदेश पोहोचवला जातो की जोपर्यंत दूधात काही विशेष तत्वं मिसळली जात नाहीत तोपर्यंत ते पौष्टिक होत नाही. अशा जाहिरातींचा काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे.
संशोधन व आधुनिकीकरण : दूध उत्पादन हे किफायतशीर होण्यासाठी वेगवेगळ्या संशोधनाची गरज आहे. ज्याप्रमाणे कार्पोरेट संस्था विविध प्रकारची उत्पादने बाजारात घेऊन येतात त्याचप्रमाणे सहकारामध्ये देखील दूध / दुग्धजन्य पदार्थांमध्ये विविधता आणण्यासाठी संशोधन करण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता असणारे लोक योग्य त्याठिकाणी कामकाज करण्यास घेतले पाहिजेत. सहकारी दूध संघांनी एन ऐ बी एल (नॅशनल अॅक्रेडिटेशन बोर्ड फॉर टेस्टींग अॅण्ड कॅलिब्रेशन लॅबोरेटोरीज) सारख्या प्रयोगशाळा विकसित करणे गरजेचे आहे. तसेच आर अॅण्ड डी (रिसर्च अॅड डेव्हलपमेंट) सारखे विभाग तयार करून दूध / दूग्धजन्य पदार्थांचे निरनिराळे संशोधन केले गेले पाहिजे.
वाहन उद्योगामध्ये ज्याप्रमाणे शोरूम असतात, जिथे चाचणी विक्री व सेवा मिळतात त्याच पद्धतीने गाई व म्हशींची खरेदी विक्री करण्यासाठी खात्रीशीर बाजार, पशुवैद्यकीय क्षेत्रात शैक्षणिक माहिती देण्यासाठी 24 तास फिरती सेवा देणारे पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करणे. जनावरांचं अन्न, चारा, वैरण यासाठी चांगल्या प्रकारची बी-बियाणे यामध्ये आधुनिकीकरण करणे ज्यायोगे कमी दर्जाचं अन्न जनावरांना मिळणार नाही. योग्य ते कायदे, विस्तारित क्षेत्र, प्रशिक्षण याद्वारे चांगले मनुष्यबळ तयार करता येऊ शकेल. या व अशा विविध योजनांचा अवलंब केल्यास सहकार क्षेत्र नक्कीच कार्पोरेट क्षेत्राच्या बरोबरीने उभे राहण्यास सक्षम असेल.
श्री विष्णू ध.हिंगे, चेअरमन
पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरी, पुणे