राज्यात यंदा सर्वत्र जोरदार पाऊस झाल्याने यंदा गव्हाची लागवडही वाढणार आहे. मात्र, लागवड वाढीबरोबरच गव्हाच्या उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न केल्यास अधिक उत्पादन व पर्यायाने अधिक उत्पन्न मिळण्याची देखील संधी आहे. त्यासाठी गहू लागवडीचे तंत्रज्ञान व व्यवस्थापन तसेच इतरही बाबींचे नियोजन समजून घेणेही आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे
भारतातील पंजाब व हरियाणा राज्यांची गव्हाची सरासरी उप्तादकता ४५ क्विं./हेक्टरच्या आसपास आहे. महाराष्ट्राची गव्हाची सरासरी उप्तादकता फक्त 20 क्विं./हेक्टरी इतकीच आहे. काय आहे महाराष्ट्रातील कमी उत्पादकतेची कारणे व याबाबींचे काळजी घेतल्यास महाराष्ट्रही पंजाब – हरियाणाच्या बरोबरीने गव्हाचे उत्पादन घेऊ शकतो…!
* हलक्या ते मध्यम जमिनीत गव्हाची लागवड.
* गहू पिकासाठी पाण्याची करतरता.
* पाण्याची उपलब्धता असल्यास इतर पिके घेण्याचा कल.
* शिफारस केलेल्या वाणाची लागवड न करणे.
* गहू पीक वाढीच्या सुरवातीच्या दाणे भरण्याच्या व पक्व होण्याच्या अवस्थेत जास्त तापमान.
* हवामानातील वेळोवेळी होणारे बदल.
* शिफारशीपेक्षा कमी खताचा वापर.
* किड व रोगांचा प्रादुर्भाव.
* १५ डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी.
* नवीन प्रसारित वाणांचे योग्य प्रतीच्या बियाण्याची उपलब्धता न होणे.
जमीन
गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन अत्यंत आवश्यक असते.
हवामान
गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी २५ अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
पूर्वमशागत
गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १.00 मीटर खोलीपर्यंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरिप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने १५ ते २० सेमी खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
पेरणीची योग्य वेळ
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ किंवटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.
बियाणे आणि बीजप्रक्रिया
गव्हाच्या अधिक उत्पादनाकरिता हेक्टरी २० ते २२ लाख झाडे शेतात असणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रती हेक्टरी १oo किलो बियाणे वेळेवर पेरणीसाठी वापरावे. उशिराच्या पेरणीसाठी कमी तापमानामुळे गव्हाच्या पिकास कमी फुटवे येत असल्यामुळे बियाण्याचे प्रमाण १२५ ते १५० किलो प्रती हेक्टरी एवढे ठेवावे. जिरायत पेरणीसाठी ७५ ते १०० किलो प्रती हेक्टरी बियाण्याचा वापर करावा.
पेरणीपूर्वी बियाण्यास बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रती १० किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू संवर्धन यांची प्रती २५० ग्रॅम या प्रमाणे बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. यामुळे उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते.
पेरणी करताना..
गव्हाच्या वेळेवर आणि जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत २० सें.मी. तर उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. तसेच पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. गव्हाची पेरणी उभी आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे. जमिनीची नांगरट २० सें.मी. खोलवर व शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर करावी.
रासायनिक खत मात्रा
गहू पिकासाठी रासायनिक खतांच्या मात्रा जिरायत, बागायत वेळेवर व बागायत उशिरा पेरणीसाठी वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत.
पेरणीच्या वेळी – नत्र / स्फुरद / पालाश (किलो हेक्टर) (याप्रमाणे)
बागायत वेळेवर पेरणी – १२० /६० / ४०
बागायत उशिरा पेरणी – ८० / ४० / ४०
जिरायत पेरणी – ४० / २० / ००
बागायती गहू पिकासाठी अर्धे नत्र , संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर आणि पहिल्या पाण्याच्या पाळी अगोदर द्यावे. जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्यावेळी द्यावे.
पाणी व्यवस्थापन
गव्हाची पेरणी शक्यतो पेरणीपूर्वी शेत न ओलवता उपलब्ध ओलावा असताना करावी. पेरणीनंतर साधारणपणे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाणी देण्याच्या दृष्टीने पिक वाढीच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था पुढीलप्रमाणे आहे.
मुकुटमुळे फुटण्याची सुरवात : पेरणीनंतर १८ ते २१ दिवसांनी
कांडी धरण्याची अवस्था : पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी
फुलोरा , चिक धरण्याची अवस्था : पेरणीनंतर ६५ ते ७० दिवसांनी .
दाणे भरण्याची अवस्था: पेरणीनंतर ८० ते ९० दिवसांनी
अपुऱ्या पाणी पुरवठा परिस्थितीही कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
हरभरा – आदर्श लागवड, बीजप्रक्रिया व व्यवस्थापनाची माहिती..
पाणी कमी असल्यास पाण्याच्या पाळ्या कधी व कशा द्याव्यात
गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर ४० ते ४२ दिवसांनी द्यावे.
गहू पिकास दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी २० ते २२ दिवसानी आणि दुसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी द्यावे.
गहू पिकास तीन पाणी देणे शक्य असल्यास पेरणीनंतर पहिले पाणी २० ते २२ दिवसांनी , दुसरे ४० ते ४२ व तिसरे ६० ते ६५ दिवसांनी द्यावे. गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत ४१ टक्के घट येते आणि दोन पाणी दिले तर उत्पादनात २0 टक्के घट येते.
आंतरमशागत
गव्हात चांदवेल, हराळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव आढळतो .याकरिता जरुरीप्रमाणे एक किंवा दोन वेळा खुरपणी करावी. तसेच कोळपणी करून रोपांना मातीची भर द्यावी. आंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो आणि जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते.
पेरणीनंतर ३० ते ३५ दिवसांनी तणे दोन ते तीन पानांच्या अवस्थेत आल्यावर स्टिकरमध्ये मिसळून तणनाशकाची पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पीक संरक्षण
तांबेरा : तांबेरा प्रतिबंधक वाणांचाच पेरणीसाठी वापर करावा. तांबे-याची लागण दिसून आल्यास डायथेन एम-४५ हे बुरशीनाशक प्रती हेक्टरी १.५ किलो, ५00 लीटर पाण्यातून फवारावे.
करपा : करपा रोगाच्या नियंत्रणासाठी काँपर ऑक्झिक्लोराईड आणि मॅन्कोझेब प्रत्येकी १२५० ग्रॅम या बुरशीनाशकाचे मिश्रण ५00 लीटर पाण्यातून प्रती हेक्टर फवारावे.
मावा
रासायनिक नियंत्रण : किडीचा प्रादुर्भाव दिसून येताच थायोमिथोक्झाम २५ डब्ल्युजी १ ग्रॅम किंवा अॅसेटामिप्रिड २० एसपी ५ ग्रॅम प्रती १० लि. पाणी या प्रमाणात १५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारावे.
जैविक नियंत्रण : मेटारहीझीयम अँनिसोपली किंवा व्हर्टीसिलीयम लेकनी ५0 ग्रॅम प्रती १0 लीटर पाणी या प्रमाणात फवारावे.
उंदीर नियंत्रण : प्रथम शेतातील सर्व बिळांची पाहणी करावी. बिळांची तोंडे चिखलाने किंवा मातीने बंद करावीत. दुस-या दिवशी यापैकी जी बिळे उघडी दिसतील त्यात उदरांचे अस्तित्व आहे, असे समजावे. विषारी आमिष तयार करण्याकरिता कोणत्याही धान्याचा जाडाभरडा ५o % भाग घेऊन त्यात एक विष टाकून मिश्रण तयार करून प्रत्येक बिळामध्ये साधारणपणे एक चमचा मिश्रण काठीच्या साहाय्याने खोलवर टाकावे. बिळे पालापाचोळा किंवा गवत टाकून झाकून घ्यावीत आणि बिळांची तोंडे चिखलाने बंद करावीत. सामुदायिकरीत्या याप्रमाणे मोहिम हाती घेतली तर अधिक फायदा होतो.
(सौजन्य – कृषी विभाग, महाराष्ट्र शासन)