20 मे जागतिक मधमाशी दिनानिमित्त..
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग एका भीतीच्या सावटाखाली आले आहे. कृषी क्षेत्रालाही त्याचा फटका बसला आहे. मात्र आज सगळे जग बंद आहे आणि फक्त शेतकरी या जगाला अन्न पुरवतो आहे. शेतीचे महत्व या ठिकाणी अधोरेखित झाले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी निश्चितच आपल्याला शिकायला मिळाल्या आहेत. विकास हवा परंतु तो निसर्गाच्या विरोधात नसावा तर शाश्वत असावा असे या गोष्टींमधून जाणवले आहे.
कृषीक्षेत्रात सुद्धा असाच विकास व्हायला हवा. महाराष्ट्राने कृषी क्षेत्रात भरपूर प्रगती केली आहे मात्र त्याला आता थोडी शाश्वत शेतीची जोड द्यावी लागणार आहे. आज आपण भाजीपाला व फळे यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करत आहोत मात्र त्यावर प्रक्रिया किती होते तर दोन टक्क्यांपेक्षा जास्त नाही.
त्यामुळे कोणत्याही प्रकारची बिकट परिस्थिती निर्माण झाली की नुकसान सर्वप्रथम शेतीमालाचे होते. चांगला पैसा मिळतो म्हणून शेतकरी अशा कॅश क्रॉपची लागवड करणे स्वाभाविक आहे. कमी उत्पन्न मिळते म्हणून धान्य, कडधान्य व तेलबिया यांच्या लागवडीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. आता मात्र समतोल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांना वळावेच लागेल.
शाश्वत शेती म्हटली की मधमाशीपालन व गोपालन या शिवाय ती होऊ शकणार नाही हे तितकेच खरे. यापैकी गोपालनाचे महत्व सर्वांनाच माहित आहे. मात्र आपण सर्वांनीच निसर्गातील मधमाशी या सर्वात जास्त परोपकारी किटकाचे महत्त्व जाणून तिच्या संवर्धनासाठी प्रयत्न करायला हवेत.
महाराष्ट्राचा तीनही हंगामात येऊ शकणाऱ्या व मधमाशीपालनासाठी अत्यंत उपयुक्त असलेल्या सुर्यफुल, बाजरी, मका, तूर, शेवगा आणि आवळा या सहा पिकांवर जर लक्ष केंद्रित केले तर त्याचे फलदायी परिणाम समोर येणार आहेत.
प्रत्येक विभागात घेतल्या जाणाऱ्या पिकांसोबतच या पिकांची जर योग्य नियोजन करून लागवड केली तर मधमाशीपालन यशस्वी होईल. मधमाशीमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे इतर पिकांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे.
वरील सहा पिकांवर विशेष करून किटकनाशकांच्या जास्त फवारण्या होत नसल्यामुळे मधमाश्यांना ते पुरकच असणार आहे.
सुर्यफुलापासून तयार होणाऱ्या मधाला परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे कारण या मधाचे लवकर स्फटिकीभवन होते व अशा मधाला पाश्चिमात्य देशात ‘स्प्रेड हनी’ म्हणून मोठी मागणी असते. महाराष्ट्रात सुद्धा मधाला मोठी मागणी आहे. मधाचा वापर आता फक्त औषधापुरता न राहता दैनंदिन आहारात त्याचा वापर वाढत आहे.
मागील वर्षी भारतातील एकूण मधाचे उत्पादन साधारण सव्वा लाख मेट्रिक टन होते . यापैकी महाराष्ट्र्रात मध उत्पादनाचे प्रमाण एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. म्हणजेच महाराष्ट्रात मध उत्पादनाला मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.
मधमाश्या बाजरी, मका या पिकांपासून मोठ्या प्रमाणावर पराग गोळा करतात. या परागामुळे मधमाश्यांची प्रतिकारक्षमता वाढते व मधमाश्यांच्या वसाहती सुदृढ होतात. मधमाशी कॉलनी विभाजन या दरम्यान चांगले होऊ शकते. बाजरी पासून जितके उत्पन्न मिळते त्यापेक्षा जास्त उत्पन्न बाजरीच्या परागापासून मिळू शकते. पराग म्हणजेच पोलन हे प्रथिनांचा मोठा स्रोत असतात. पराग 1000 रू प्रति किलो दराने विकला जातो. अर्थातच मार्केटिंग आणि ब्रँडिंगची त्यासाठी आवश्यकता असते.
गावागावांत तरुण शेतकरी एकत्र येऊन व योग्य ते प्रशिक्षण घेऊन जर वरील सहा पिकांची लागवड केली आणि मधमाशी पालन सुरू केले तर ग्रामीण भागाचा कायापालट होवू शकतो. मधाच्या उत्पादनासोबतच सुर्यफुलाच्या तेलाचे लघुउद्योग, तूर डाळ प्रक्रिया, आवळा प्रक्रिया, मका प्रक्रिया असे छोटे पूरक उद्योग जर सुरू केले तर गावाचे अर्थकारण बदलू शकेल. विशेष म्हणजे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मोठी संधी उपलब्ध होईल.
या प्रकारचे पीक व्यवस्थापन केल्यामुळे धान्य, कडधान्य आणि तेल बियांच्या उत्पन्नात समप्रमाणात वाढ होईल. आज आपण बघतोय की भारतात तेलबियांचे उत्पादन अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्याला अनेक कारणे आहेत. एकरी उत्पन्न कमी येणे हे एक महत्वाचे कारण आहे. सुर्यफुलाच्या शेतात मधमाशी कॉलनी ठेवल्यास सुर्यफुलाचे उत्पन्न दुप्पट होऊ शकते.
उत्पन्न चांगले मिळाले तर शेतकरी सुद्धा सुर्यफुलाची लागवड करण्यासाठी तयार होतील. जर शेतकऱ्यांनी एकत्रितपणे येऊन गटागटाने अशी शेती केली तर सामुदायिक उत्पन्नात वाढ होईल. मधाचे उत्पन्न मिळेल. चांगल्या क्वालिटीच्या सुर्यफुलामुळे तेलाचे उत्पादन सुद्धा चांगले होईल. बाजरी मका तूर या टिकावू शेतीमालाचे उत्पादन मिळेल.
आजकाल लाकडी घाण्यापासून बनवलेल्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही मागणी मोठी असल्यामुळे मार्केटचा प्रश्न राहणार नाही. मात्र जेव्हा शेतकरी एकत्र येऊन गटशेती करतील तेव्हाच हे शक्य होईल.
आज भारतात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात होत आहे. या आयात केलेल्या तेलासाठी फार मोठा निधी आपल्याला डॉलर्स स्वरूपात खर्च करावा लागतो. त्यातही पाम तेलाची आयात खूप मोठी आहे व त्याचा भारतीय खाद्यतेल उद्योगात होणारा वापर हा वेगळा आणि गंभीर विषय आहे.
या एकत्रित प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात सुर्यफुलावर व उर्वरित पिकांवर आधारित एक मोठा उद्योग उभा राहू शकेल. एकंदरीतच मधमाशी पालनामुळे ग्रामीण भागात शाश्वत शेतीच्या माध्यमातून सुबत्ता आणता येईल.
मधमाशीपालनामध्ये प्रशिक्षण खूप महत्वाचे आहे. या संदर्भात छोटासा प्रयत्न म्हणून आम्ही पिंपळगांव बसवंत येथे ‘बसवंत मधमाशी उद्यान व प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले. मधमाशी या विषयावर कृषी क्षेत्रात प्रचार व प्रसार व्हावा या उद्देशाने हे प्रशिक्षण केंद्र चालू केले असून ते सर्वांसाठी निःशुल्क आहे.
या ठिकाणी महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी गरजू विद्यार्थ्यांना व शेतकऱ्यांना मोफत प्रशिक्षण देण्यात येते.
तसेच व्यावसायिक प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. एक दिवसीय, तीन दिवसीय व पाच दिवसांचे असे हे प्रशिक्षण असते. हे प्रशिक्षण सशुल्क असते.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व तरुणांनी मधमाशीपालनातील संधीचा विचार करावा व अत्यंत परोपकारी अशा मधमाशीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत.
संजय पवार,
कार्यकारी संचालक,
पूर्वा केमटेक प्रा. ली.
टीप:-आपल्याला मधमाशी पालनाविषयी आवड असेल, या संदर्भात वेळोवेळी अधिक माहिती हवी असेल किंवा भविष्यात काही प्रशिक्षण घ्यायचे असेल तर वर दिलेल्या लिंक वरील माहिती भरून पाठवावी व आपली नोंदणी करावी. आमची टीम तुम्हांला संपर्क करेल
अधिक माहितीसाठी संपर्क:-
श्री. नितीन कराळे-
बसवंत मधमाशी उद्यान 7774089517,