कोंबड्यांमधील ॲपोकॅलिप्टीक व्हायरस बद्दल पशुसंवर्धन विभागाचे केला मोठा खुलासा
प्रतिनिधी,( पुणे)
मागील काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीने अमेरिकेतील आहारतज्ज्ञ डॉ. मायकल ग्रेगर यांचा हवाला देऊन पोल्ट्रीमध्ये कोरोना विषाणूपेक्षा भयंकर असा ॲपोकॅलिप्टीक व्हायरस येण्याची शक्यता असून त्यामुळे मानव समूहामध्ये कोरोनापेक्षा जास्त मृत्यू होण्याची शक्यता आहे अशी बातमी प्रसिद्ध केली होती. परंतु ॲपोकॅलिप्टीक असा कोणताही व्हायरस अस्तित्वात नसल्याचे पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार, ॲपोकॅलिप्टीक नावाचा व्हायरस हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पशूंमधील रोगांचे संनिरिक्षण करणाऱ्या ओआयई संस्थेने नमूद केलेल्या कोबड्यांना बाधित करणाऱ्या विषाणूंच्या यादीमध्ये नाही. ॲपोकॅलिप्टीक व्हायरस असे शास्त्रीय नाव असणारा कोणताही व्हायरस अस्तित्वात नाही. ॲपोकॅलिप्टीक या शब्दाचा अर्थ जगाचा विनाश करणारा असा असून डॉ. मायकल यांनी तो त्या अर्थानेच वापरला असावा असे अनुप कुमार यांनी सांगितले.
तसेच डॉक्टर मायकल ग्रेगर हे आहारतज्ज्ञ आहेत परंतु मानवी स्वास्थ तज्ज्ञ नाहीत व सदर बातमी शास्त्रीयदृष्ट्या शहानिशा न करता प्रसिध्द करण्यात आली असल्याचे देखील महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने नमूद केले आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाने दिलेल्या ह्या खुलास्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकांना धीर येणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावेळी पोल्ट्री बद्दल उठलेल्या अनेक अफवांमुळे पोल्ट्री उद्योगाला आधीच मोठा फटका बसला आहे त्यात ॲपोकॅलिप्टीक व्हायरस बद्दल आलेल्या बातमीने लोकांमध्ये परत भीतीचे वातावरण तयार होऊन पोल्ट्री उद्योगाला फटका बसू शकत होता. परंतु विद्यापीठाने वेळेवर खुलासा करून आधीच संकटात असलेल्या पोल्ट्री व्यवसायला अजून संकटात जाण्यापासून नक्कीच वाचवले आहे.
देशातील पोल्ट्री उद्योग हा संकटात आल्याने त्याचा फटका हा मका उत्पादक शेतकर्यांना देखील बसत आहे. मक्याचे भाव हे ८०० रुपये ते ११०० रुपये प्रती क्विंटल इथपर्यंत कोसळले आहेत. त्यामुळे अशा परस्थितीत ॲपोकॅलिप्टीक व्हायरस च्या बातमीने ग्रामीण अर्थव्यवस्थेला अजून फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे विद्यापीठाने केलेला हा खुलासा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचला पाहिजे ज्यामुळे पोल्ट्री व्यवसायाबद्दल कोणत्याही अफवा पसरणार नाहीत.