पुणे (प्रतिनिधी) – श्रीलंका आणि तमिळनाडू किनाऱ्या लगतच्या समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकून उत्तर श्रीलंका आणि कामावरून भागामध्ये सक्रिय आहे. या प्रणाली आज दिनांक 3 रोजी अरबी समुद्राकडे सरकणार आहे त्यानंतर उत्तरेकडे येताना हे क्षेत्र आणखी ठळक होण्याचे संकेत आहेत. त्यामुळे राज्यात ढगाळ वातावरण आणि पाऊस पडण्याचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम खरिपातील तूर आणि कापसाला होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
तुरीवर अळीचा प्रादुर्भाव
* मराठवाड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे तुरीवर अळीचा धोका निर्माण झाला आहे.
* त्यामुळे योग्य वेळीच फवारणी केली तर या पिकाचे संरक्षण होणार आहे.
* याकरिता शेतकऱ्यांनी आवश्यक त्या औषधांचे मिश्रण योग्य प्रमाणात पाणी घेऊन करावे व त्यानंतर फवारणी करण्याचा सल्ला कृषितज्ज्ञ रामेश्वर चांडक यांनी दिला आहे.
* कारण तुरीचे पिक अंतिम टप्प्यात आहे.
* अशातच अळीचा प्रादुर्भाव वाढत गेला तर याचा परिणाम थेट उत्पादनावर होणार आहे.
* शिवाय बुरशीचाही धोका या वातावरणामुळे झाला आहे त्यामुळे बुरशीनाशकाची फावारणी करणे गरजेचे झाले आहे.
कापसाला गुलाबी बोंडअळीचा धोका
* खरीपातील कापसाला यंदा विक्रमी दर मिळत आहे.
* त्यामुळे सोयाबीनचे झालेले नुकसान या पिकातून भरुन निघेल असा विश्वास शेतकऱ्यांना आहे. मात्र, आता ढगाळ वातावरणामुळे अंतिम टप्प्यात गुलाबी बोंडअळीचा धोका वाढला आहे.
* मध्यंतरी अतिवृष्टीच्या दरम्यानही या पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झालेला होता.
* कापूस वेचणी सुरू असताना निर्माण झालेले चित्र शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे आहे.
* वेळेत वेचणीचे काम केले तरच कापूस शेतकऱ्यांच्या पदरी पडणार आहे.
* अन्यथा सोयाबीनप्रमाणेच कापसाचेही नुकसान होऊ शकते.
रब्बीसाठी पोषक पाऊस
खरीपातील केवळ कापूस आणि तुर हीच पिके आता शेतात आहेत. शिवाय सोयाबीनच्या क्षेत्रावर रब्बीची पेरणी सुरु झाली आहे. मराठवाडा आणि पुणे विभागात सरासरीच्या 10% क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी मशागतीची कामे आटोपली आहेत त्यांच्यासाठी हा पाऊस लाभदायी ठरणार आहे. कारण पेरणीसाठी आवश्यक असणारी ओल ही या पावसामुळे मिळणार आहे. त्यामुळे पाऊस झाला तर रब्बीसाठी फायदेशीर मात्र, ढगाळ वातावरणाचा धोका कापूस व तुरीला राहणारच आहे.