पुणे ः कांदा हे पीक हे संवेदनशील असून त्याला योग्य वेळी योग्य खते देणे अत्यंत गरजेचे आहे. साधारणतः दोन ते तीन टप्प्यात खतांची मात्रा विभागून दिली असता, त्याचा चांगला फायदा होत असल्याचे कृषीतज्ज्ञांचे म्हणणे आहे. कांदा पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज असते. त्यामुळे खते देताना योग्य व्यवस्थापन केले तर ते फायद्याचे ठरते.
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन
कांदा पिकाची मुळे जास्त खोलवर नसतात. त्यामुळे त्यांना योग्य वेळी खते देणे आवश्यक आहे. कांद्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी हेक्टरी 25 ते 30 टन चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे कांद्याची साठवणक्षमता वाढते. यामध्ये आपण रब्बी कांद्यांचा विचार केला, तर 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे. नत्राच्या 100 किलो मात्रेपैकी अर्धे नत्र म्हणजेच 50 किलो, पूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. उरलेले 50 किलो नत्र कांदा पुनर्लागवडीनंतर एक अथवा सव्वा महिन्यांनी द्यावे. नत्र विभागून देण्याचा फायदा असा होतो, की कांदा पूर्ण पोसल्यानंतर नत्राची आवश्यकता नसते. अशावेळी नत्राचा पुरवठा केला तर काद्यांमध्ये विकृती येऊ शकते. जसे की जोड खांदे येणे, चाळीत कांदा साठवल्यानंतर सडण्याचे प्रमाण वाढणे तसेच कांदे डेंगळे होणे इत्यादी प्रकार आढळतात. स्फूरदचा व्यवस्थित पुरवठा केला तर मुळांची वाढ चांगली होते. पालाश हे कांदा पिकासाठी फार महत्त्वाचे आहे. कारण पालाशच्या योग्य पुरवठ्यामुळे कांद्यांचा टिकाऊपणा वाढतो तसेच कांद्याला आकर्षक रंग देखील येतो. रब्बी हंगामातील कांदा लागवड करण्यापूर्वी पंधरा दिवस आधी गंधक हेक्टरी 45 किलो या प्रमाणात द्यावे. कांदा पिकाला शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसांनंतर जर नत्राचा पुरवठा केला तर कांद्याची पात नको त्या प्रमाणात वाढते व तिची मान जाड होते. तसेच जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते व साठवण क्षमता कमी होते.
सूक्ष्म अन्नद्रव्यांचा पुरवठा
कांदा पिकाला मुख्य अन्नद्रव्यांसोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांची देखील गरज भासते. या सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी जर कांदा पिकाला तांबे या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता भासली तर रोपांची वाढ खुंटते. तसेच कांदा पातीचा रंग करडा व निळसर होतो. जस्ताची कमतरता जर कांदा पिकाला भासली तर पात जाड होऊन खालच्या अंगाने वाकते. कांदा पिकामध्ये अशी लक्षणे दिसायला लागताच ताबडतोब शिफारशीत खताच्या मात्रा सोबत झिंक सल्फेट एक ग्राम, मॅग्नीज सल्फेट एक ग्रॅम, फेरस सल्फेट अडीच ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. कांदाची पुनर्लागवड केल्यानंतर 15, 30 आणि 45 दिवसांनी 19:19:19 या विद्राव्य खताची पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाणीयाप्रमाणे फवारणी करावी. तसेच पुनर्लागवड केल्यापासून 60, 75 आणि 90 दिवसांनी 13:00:45 (पोटॅशियम नायट्रेट) पाच ते दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. त्यामुळे कांद्याची फुगवण चांगली होते व उत्पादनातही वाढ होते.
कांदा पिकाविषयी माहिती
Very nice information