ऊस पट्ट्यात फुलविली ऑक्रीड फुलशेती.
पडवळवाडी हे सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहरापासून फक्त 15 कि. मी. अंतरावरती सांगली- वाळवा रस्त्याला लागणारे छोटेसे गाव आहे. पडवळवाडी स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा लाभलेले हे गाव शेती उत्पादनाबाबतीत आपली वेगळी ओळख या पंचक्रोशीत निर्माण करत आहे. भौगोलिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये येत असल्याने तसा पाऊस बर्यापैकी नक्कीच होतो. गावापासून 4 कि. मी. अंतरावरती कृष्णा नदी असल्याने पाण्याची उपलब्धता तशी मुबलक आहे.
पद्मभूषण डॉ. स्वातंत्र्यवीर नागनाथ अण्णा नायकवाडी, हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखाना वाळवेच्या कार्यक्षेत्रामध्ये येत असल्याचे येथील शेतकरी प्रमुख पीक म्हणून ऊस पिकाचीच लागवड करतो. याच गावातील आशिष निवृत्ती खोत हा 28 वर्षीय तरुण. पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेती करण्याच्या अनुषंगाने आशिष व त्यांचे मोठे बंधू शिवराज मारूती खोत हे नवीन शेती व तंत्रज्ञानाचा अभ्यास करु लागले. चांगला नफा मिळवून देणारे पीक या दृष्टीने ते फुलशेतीकडे बघू लागले. तसे पाहता गावामध्ये 3 ते 4 पॉलिहाऊस पहिल्यापासून असल्याकारणाने थोडाफार पॉलिहाऊस आणि त्यामधील फुलशेतीचा अंदाज या दोघा- भावांना आला. वडिलोपार्जित 7 एकर शेती असली तरी ऊसाशिवाय कोणतेही पीक या शेतीमध्ये त्यांनी घेतलेले नव्हते. सुरवातीला जरबेरा फुलाची लागवड करू या धेय्याने ही जोडी कामाला लागली.
सुरुवात
एके दिवशी एका ठिकाणी पॉलिहाऊसला भेट देत असताना ऑक्रीड फुलाबद्दल माहिती त्यांना मिळाली. तसे पाहता फुलशेतीमधील शून्य अनुभव या दोन भावांकडे होता म्हणून फक्त एक प्रयोग म्हणून 20 गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊस उभारून त्यामध्ये ऑक्रीडची लागवड करू असे दोघांनी ठरवले. यासाठी त्यांना आष्टा येथील चव्हाण आप्पांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. बँक प्रशासन वगळता सुरवातीला कुणीच या बांधवांच्या स्वप्नाचा आडफाटा दिला नाही. ऑक्रीड या फुलाची मागणी आणि उपलब्धता यामध्ये बरीच तफावत असल्याने ही फुले भारतामध्ये थायलंड या देशातून आयात केली जातात. बर्याच संशोधनानंतर आशिष यांनी पुणेस्थित के. एफ. बायोप्लांटला भेट देऊन ऑक्रीडच्या सोनिया रेड व सोनिया व्हाईट या दोन प्रजातींची माहिती घेतली. ही फुशेती करण्यासाठी यांना एक गुंठ्याला साधारण 1 ते 1.5 लाख खर्च आला. ऑक्टोबर 2016 मध्ये के.एफ. बायोप्लांटकडून घेतलेल्या रोपांची लागवड करण्यात आली व साधारण 7 महिन्यांमध्ये फुलांचे उत्पादन सुरू झाले.
खतपाणी व्यवस्थापन
के. एफ. बायोप्लांटच्या सचिन शेलार व अमोल वाणी या सल्लागारांचे उपयुक्त मार्गदर्शन यांना मिळाले असून, त्यांनी सुचवलेल्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन यांच्या पॉलिहाऊसमध्ये केले जाते. खतांचे वेळापत्रक आणि मार्गदर्शन यामुळे भरघोस उत्पादन घेण्यात खोत बंधू यशस्वी झाले आहेत. नियमित पाण्यासाठी मोटर व हँडशॉवर्स तर खत देण्यासाठी एचटीपीचा वापर येथे केला जातो. आठवड्यामधून 3 वेळा 19:19:19, 0:52:34, 0:0:50, 13:40:13 कॅल्शियम नायट्रेटसारखी रासायनिक खते दिली जातात. या सगळ्या प्रक्रियांसाठी पाण्याचे पीएच मेंन्टेन केले जाते.
औषध व्यवस्थापन
ऑक्रीडवरती बहुधा बुरशी आणि रसशोषणारे कीटक यांचा दुष्परिणाम सर्वात जास्त होतो. तसेच गोगलगाईमुळे देखील रोपांचे बरेच नुकसान होते. वेळात्रक आणि रोग बघून समन्वय साधत आठवड्याला एकदा रोगप्रतिबंधक बुरशीनाशक, कीटकनाशक यांची फवारणी सल्लागारांच्या सल्ल्याने केली जाते.
कामगार व्यवस्थापन
फुलशेतीचा हंगाम हा वर्षभर असल्याने विविध कामासाठी मजुरांची गरज हि वर्षभर असते. त्यामुळे खत-पाणी आणि औषध फवारणी तसेच फुले काढणी व पॅकिंगसाठी 2 व्यक्ती 12 महिने लागतात. सकाळच्या सत्रामध्ये खत-पाणी आणि औषध फवारणी केली जाते. कामगारांच्या कामाचे नियोजन व मार्केट अभ्यास हे खोत बंधू अगदी काटेकोरपणे करतात.
फुल विक्री
उत्पादित केलेला माल हा तूम्ही बाजारात कशा प्रकारे सादर करतात त्यानुसार बऱ्याचदा भाव व गुणवत्ता या बाबी ठरविल्या जातात. खोत बंधूनी याकडेही काटेकोरपणे लक्ष दिले आहे. उत्पादीत फुले 20 काड्यांचा बंडल करून प्लास्टीक पिशवीमध्ये भरून बॉक्समध्ये पॅक केली जातात. एका बॉक्समध्ये 15 बंडल याप्रमाणे ट्रान्सपोर्ट करून ही फुले विक्रीसाठी मुंबई आणि पुणे येथेल बाजारात पाठवली जातात.
मागणी
बाजारपेठेत ऑक्रीड फुलाला तशी 12 महिने मागणी असते. मोठमोठाली हॉटेल्स, समारंभ, सभा यामध्ये डेकोरेशनसाठी ही फुले आवर्जून वापरली जातात. लग्नसमारंभामध्ये आणि गणेशोत्सव व दुर्गामाता उत्सवा व विविध सणादरम्यान या फुलांना चांगली मागणी असते.
कृषी विभागाचे मार्गदर्शन
आशिष खोत व शिवराज खोत यांना आष्टा येथील मंडळ अधिकारी मधुकर घाटगे तसेच इस्लामपूर स्थित कृषी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे उत्कृष्ट असे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले आहे.
फूल शेतीचे अर्थकारण
सर्वसाधारण ऑक्रीड फुलाच्या 20 काड्यांच्या एका बंडलला 300 ते 350 इतका दर मिळतो. खोत बंधूंना लग्नसराईच्या दिवसांमध्ये बंडलला 650 इतका उच्चांकी दर मिळाला आहे. औषध फवारणी, मजुरी खत आणि वाहतूक हा सर्व खर्च वजा जाता महिन्याकाठी 20 गुंठेमध्ये 80 हजार रुपये शिल्लक राहतात, असे आशिष आवर्जून सांगतात.
श्री. आशिष खोत, पडवळवाडी, ता.वाळवा, जि.सांगली.
संपर्क ः 8830028507
महाराष्ट्रात डेंड्रोबियम ऑर्किडचा जोम
महाराष्ट्रातील सांगली भागात डेंड्रोबियम ऑर्किड जोमाने उमलत आहे. के. एफ. बायोप्लान्टचे ऑर्किड उत्पादक श्री. आशिष खोत यांनी त्यांच्या शेतात डेंड्रोबियमचे उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे. अनेक आव्हानांचा खडतरपणे सामना करून के. एफ.च्या या फुलोत्पादकांनी हे घवघवीत यश संपादती केले आहे.
डेंड्रोबियमची शेती हा तसा जोखमीचा व्यवसाय आहे, परंतु के. एफ. च्या तंत्रज्ञान अधिकार्यांपर्यंत फुलोत्पादकांच्या प्रकल्पांची वेळोवेळी पाहणी, तसेच अत्याधुनिक लागवड व तंत्रज्ञान मार्गदर्शन करण्यात येत असल्यामुळे फुलोत्पादकांना डेंड्रोबियमचे यशस्वी उत्पादन घेणे शक्य होते. यामुळे डेंड्रोबियम लागवडीस प्रतिकुल असणार्या प्रदेशातही के. एफ. च्या साहाय्याने अनेक फुलोत्पादक आधुनिक फुलोत्पादनाचा अवलंब करून भरघोस उत्पादन घेत आहेत.
या फुलोत्पादकांना दिलेले तंत्रज्ञान सहाय्य व मार्गदर्शन यासाठी के. एफ. बायोप्लांटसचे डॉ. अमोल वाणी, श्री. ॠचिन शेलार, श्री. अजित जाधव, श्री. शरद पवार हे सर्व अधिकारी प्रशंसनेस पात्र आहेत. जिद्द, अविरत प्रयत्न व आधुनिक कृषी करण्याविषयी इच्छाशक्ती याबद्दल सर्व यशस्वी फुलोत्पादकांचे हार्दिक अभिनंदन.