तीन वर्षाला १८ लाख रु निव्वळ नफा
शेतीतही सध्या आधुनिकतेचं वारं वाहत आहे. पारंपरिक शेतीला फाटा देऊन अनेक शेतकरी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून, शेतीत विविध प्रयोग करत असून त्यांना चांगल यश येताना पाहायला मिळतंय. असेच यश आरग तालुका मिरज जि. सांगली येथील प्रयोगशील शेतकरी जयसिंग पाटील यांनी मिळविले आहे. सांगली जिल्हा ऊस, द्राक्षे, हळद यासारख्या नगदी पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तरीही या नगदी पिकांच्या मागे न लागता जयसिंग यांनी ग्रीनहाउस उभारून फुल शेतीमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली आहे. त्यामाध्यामातून त्यांनी तीन वर्षाला १८ लाख रु निव्वळ नफा मिळविला आहे.
जयसिंग अण्णासो पाटील यांचे मूळगांव आरग सांगली शहरापासून १५ किमीवर आहे. येथे त्यांची वडिलोपार्जित २ एकर जमीन आहे. कला शाखेत पदवीचे शिक्षण घेत असतांनाच शेतीमध्ये काही नवीन प्रयोग करून पारंपारिक शेतीपेक्षा वेगळी शेती करण्याकडे त्यांचा कल होता. कर्नाटक राज्याची सीमा जवळच असल्याने गावात बाहेरून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचमुळे येथील ऊस हा मोठ्या प्रमाणात शेजारील राज्यातील साखर कारखान्यात जातो. पण परराज्यात जाणाऱ्या कारखान्यात बऱ्याच वेळा पैश्याच्या बाबत अनिश्चितपणा असतो. मेहनतीमुळे पिकविलेला माल हा कमी भावात विकला जात असल्याने येथील ऊसशेतीपासून शेतकरी दूर जात आहे.
दुष्काळाचे चटके
१९७२ सालच्या भीषण दुष्काळात आण्णासो पाटील (जयसिंग यांचे वडील) यांनी भयावह परिस्थितीचा सामना केला होता. अन्न, पाण्याअभावी जनावरे तडफडतांना पहिली. गावेच्या गावे ओस पडत होती. त्यांना सुद्धा या दुष्काळात गांव सोडावे लागले. परप्रांतात मिळेल ते काम करून दिवस काढले. हळूहळू दुष्काळाचे सावट कमी झाल्यावर त्यांच्या कुटुंबाने गावाकडे परतण्याचा निर्णय घेतला.
व्यवसाय सुरुवात
शालेय जीवन सुरु असतांनाच व्यवसाय करायचा व पॉलीहाउस मध्ये शेती करायची असा मनोमन निर्णय ठरला होता. त्याप्रमाणे शाळेचा मित्र प्रमोद पाटील यांच्या सोबत दुध व्यवसाय सुरु केला, परंतु मन मात्र पॉलीहाउस कडेच ओढा घेत होते. त्यामुळे व्यवसाय मित्राला सांभाळायला सांगून पॉलीहाउस सुरु करण्याच्या हालचाली सुरु केल्या
पॉलीहाउसचा चार वर्ष अभ्यास
महाराष्ट्र व शेजारील राज्यात विविध ठिकाणी भेटी देत पॉलीहाउसबाबत बारकाईने अभ्यास केला. यात पॉलीहाउस धारकांना आलेले चांगले वाईट अनुभव, पॉलीहाउसची गुणवत्ता व इतरही महत्वपूर्ण माहिती जमा केली.
पॉलीहाउस उभारणीसाठी बँकेचे कर्ज
पॉलीहाउस उभारणीसाठी आर्थिकदृष्ट्या खूप गुंतवणूक लागते. उत्तम प्रतीचे कापड व इतरही सामान घेतांना तडजोड करावी लागत नाही. त्यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जात काम पूर्ण होत नसल्याने घरचे काही भांडवल जमा करावे लागले त्यासाठी दागिने, जनावरे विकून भांडवल उभे करावे लागले. एप्रिल २०१६ मध्ये प्रत्यक्ष उभारणीला सुरुवात झाली.
लागवड व व्यवस्थापन
महाराष्ट्रात पुणे, नाशिक, सातारा, सांगली येथे थंड हवामान असलेल्या भागात कार्नेशनचे पीक चांगले येते. मध्यम प्रतीच्या काळ्या अथवा पोयट्याच्या आणि पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीत कार्नेशनचे पीक चांगले येते. पाण्याचा निचरा चांगला झाला नाही तर कार्नेशनच्या पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो. पाटील यांची जमीन माळरानावर असल्याने मुरमाड प्रकारची आहे त्यामुळे २७ गुंठ्यासाठी २५० ब्रास लाल माती , ७० ट्रॉली शेणखत टाकून बेड तयार करण्यात आले. कार्नेशनची रोपं फक्त लाल मातीतच लावली जातात. शेडमध्ये लाल माती पसरवून प्रत्येकी रांगेत बेड तयार केलेले आहेत. लाल मातीमुळे झाडांच्या मुळ्या बंद होण्याचा धोका कमी होतो. तसेच या मातीची खत स्वीकारण्याची क्षमता देखील जास्त असते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात ७० सेमी X ३० सेमी या अंतरावर कार्नेशन लागवड केली. या मध्ये विविध जातीचे कार्नेशन निवडले. हि रोपे पुणे ३५ रु दराने विकत घेतली गेली. २७ गुंठ्यासाठी १६५०० रोपे लागली. त्यासाठी सुमारे ५ लाख ७७ हजार रु खर्च झाला. कार्नेशन फुलांची लाल, पिवळा, पांढरा अशा विविध रंगांच्या फुलांची लागवड त्यांनी केलीय. रोपांना शेणखत, गांडूळखत टाकण्यात आलंय. रोज या रोपांना २० मिनिटं पाणी दिलं जातं. याशिवाय रोपांना वेळोवेळी औषध फवारणी केली जाते. रोपं नाजूक असल्यामुळं याचं किड्यांपासून संरक्षण करणं गरजेचं असतं. त्यासाठी ग्रीन हाऊसमध्ये प्रत्येक बेड जवळ किड्यांना आकर्षित करण्यासाठी आणि किडे चिपकण्यासाठी पिवळे स्टिकअर्स लावण्यात आलेले आहेत. रोपांची निगा राखण्यासाठी राखण्यासाठी ६ महिला मजूर इथ राबतात.
कीड रोग व्यवस्थापन
या फुलावर प्रामुख्याने थ्रीप, लाल कोळी, नाग आळी यासारखे रोग येतात. यासाठी त्यांनी एका स्थानिक औषधी कंपनीच्या झिरो रेसिड्यू उत्पादनाचा वापर केला. यामुळे कोणत्याही प्रकारच्या थ्रीप व किडींचा प्रादुर्भाव यावर झाला नाही.
खर्च:-
सुरुवातीच्या काळात पॉलीहाउस उभारणी, लागवड, औषधी, मजूर असे मिळून ३० लाख रु खर्च आला.
उत्पादन:-
साधारणता देशात सर्वच ठिकाणी कार्नेशन मधील विविध जातींच्या फुलांना खूप मागणी आहे. प्रती फुल २.५० पैसे या सरासरी भावाने विक्री करण्यात आली. त्यातून आम्हाला १८ लाखांचा निव्वळ नफा खर्चवजा जाता ३ वर्षात मिळाला आहे. पॉलीहाउस मधील उत्पन्नामुळे मला मुलांना चांगल्या शाळेत घालता आले, समाजात प्रतिष्ठा मिळाली त्याचबरोबर फुल वाहतूक व इतर कारणासाठी बोलेरो गाडी घेता आली असे ते मोठ्या अभिमानाने सांगतात.
प्रतिक्रिया
पॉलीहाउस मध्ये मला आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी यांची खूप मदत मिळते. त्याचबरोबर आपल्यामुळे इतर लोकांना रोजगार मिळाल्याचे समाधान खूप मोठे आहे. लग्न सराईत देशात फुलांना खूप मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे दैनंदिन जिवनात देखील फुल शोभेसाठी वापरली जातात. परंतु काही वर्षापासून चीन मधून आयात केली जाणारी प्लास्टिकची फुले हि पॉलीहाउसच्या मुळावर उठली आहेत. या फुलांच्या वापरामुळे देशातील फुलशेतीचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे शासनाने या फुलावर त्वरित बंदी आणावी. नागरिकांनी देखील नैसर्गिक फुलांच्या वापरावर जोर द्यावा.
जयसिंग अण्णासो पाटील
मु.पो.आरग ता.मिरज जि. सांगली
९०९६४०६०९९