पुणे : सध्या वातावरणात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. ज्याप्रमाणे आपण आपली स्वत: ची काळजी घेतो, त्याप्रमाणे जनावरांची देखील तितकीच काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यात तापमान साधारण ४२ ते ४८ सेल्सिअसपर्यंत जात असल्याने गुरांच्या आरोग्यावर या वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम होत असतो. विशेषतः त्यांच्या पचनशक्ती आणि दूध उत्पादन क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे या दिवसात जनावरांची काळजी घेतली तर होणारे नुकसान टाळता येते.
हापूसच्या नावाने विक्रेते करताहेत ग्राहकांची फसवणूक..
सावलीतच गुरे बांधावीत
तापमानात अधिक वाढ झाल्यानंतर गुरे आजारी पडून अशक्त होत असतात. त्यामुळे त्यांचे तळपत्या उन्हापासून संरक्षण होण्यासाठी गुरे नेहमी सावलीत बांधावीत. गोठ्याचे छत थंड आणि सावली देणारे असावे. शक्यतो, शेडसमोर बारदानाचे पडदे लावावेत. उन्हात जनावरांना सकाळी व दुपारी उशिरा चरायला घेऊन जावे. त्यांना मुबलक व स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. गायींपेक्षा म्हशींना उष्णतेचा त्रास जास्त होतो. उष्णता सहन करणाऱ्या घामग्रंथी म्हशीच्या कातडीत फार कमी असतात. सूर्यप्रकाश परावर्तित करण्यासाठी आवश्यक असणारी गाईसारखी कातडी असण्याऐवजी सूर्यप्रकाश काळ्या कातडीतून शोषला जाऊन म्हशीचे शारीरिक उष्णतामान वाढते. म्हणून उष्णतेचा त्रास म्हशींना अधिक होतो व म्हशी माजावर येण्याचे प्रमाण बंद होते. याउलट थंड हवामान असलेल्या गोठ्यात गाईप्रमाणे म्हशीसुद्धा उन्हाळ्यातही नियमित माजावर येतात. माजावर आलेल्या म्हशी ओळखाव्यात कारण या दिवसात त्यांच्यामध्ये माजाची लक्षणे कमी तीव्रतेची असतात. त्यामुळे दिवसातून तीन-चार वेळा निरीक्षण करावे. दुपारच्या वेळी जनावरे गोठ्यामध्ये बांधावीत. उन्हाळ्यात छपरावर गवताचे आच्छादन टाकावे. शक्य असल्यास गोठ्याच्या बाजूंनी गोणपाटाचे किंवा पोत्याचे पडदे लावून त्यावर पाणी फवारावे. जनावरांना पिण्यासाठी पाणी देताना त्यात शक्य झाल्यास मीठ व गूळ टाकावा. अशा प्रकारे व्यवस्थापन केल्यास उन्हाळ्यात होणारे कमी दूध उत्पादन वाढू शकते.
अशी घ्या काळजी
शेड प्रशस्त जागेत मोकळी हवा खेळती राहील असे तयार करावे, हवा येण्यास पुरेशी जागा ठेवावी, बर्फ किंवा गार पाण्याच्या पट्ट्या जनावरांच्या डोक्यावर बांधाव्यात जेणेकरुन त्यांना आराम मिळेल, गुरांना दररोज १ ते २ वेळा गार पाण्याने अंघोळ घालावी, जनावरांसाठी पुरेशा पाण्याची उपलब्धता असावी, गुरांना उन्हापासून वाचविण्यासाठी पशुपालन करणाऱ्यांनी शेडमध्ये पंखा, कुलर, किंवा फवारा सिस्टीम लावावी, गुरांना दिवसा शेडमध्ये बांधावे, कुठल्याही आजाराची लागण झाल्यास तत्काळ पशु वैद्यकीयांना दाखवावे, शक्यतो हिरवा चारा खाण्यास द्यावा, या दिवसात जनावरांना भूक कमी लागते व तहान जास्त लागते. यामुळे गुरांना स्वच्छ पाणी पिण्यासाठी द्यावे. साधारणतः दिवसातून तीनवेळा पाणी पिण्यास द्यावे. पशुपालकांनी जानेवारीमध्ये मूग, मका, कडवल आदी पिके लावावीत. यामुळे उन्हाळ्यात गुरांना हिरवा चारा उपलब्ध होईल. ज्यांच्याकडे बागयत जमिन नाही त्यांनी आधीच घास कापून त्याला उन्हात वाळवली पाहिजे. कारण घास प्रोटिन युक्त असते.
🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..