गहू हे रब्बी हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. गव्हाच्या लागवडीखालील क्षेत्र हे मात्र मर्यादित आहे. गव्हाची वाढती मागणी लक्षात घेता सन 2030 मध्ये गव्हाचे उत्पादन 100 दश लक्ष टन इतके होणे गरजेचे आहे. द्वीपकल्पीय भागात (महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू) असणारा पिकांचा कमी कालावधी, फेब्रुवारी महिन्या पासून वाढणारी उष्णता, पाण्याची कमतरता यामुळे गव्हाचे उत्पन्न मर्यादित स्वरूपात आहे. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी हेक्टरी उत्पादन उत्तर भारताच्या तुलनेत फारच कमी आहे. गव्हाच्या पिकाचे योग्य नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होऊ शकते. गहू उत्पादन वाढवण्यासाठी योग्य जमिनीची निवड, सुधारित व रोग प्रतिकारक जातीचा वापर, वेळेवर पेरणी, पाणी व्यवस्थापन, पीक व किड संरक्षण इ. द्वारे आपण गव्हाचे उत्पादन वाढवू शकतो.
गव्हावरील किडी व रोग नियंत्रण :
गहू पिकावर अनेक किडींची नोंद करण्यात आली असली तरी आपल्या विभागात या पिकावर मुख्यतः खोडकिडी, मावा, तुडतुडे, वाळवी इत्यादी किडी व प्राण्यामध्ये उंदराचा प्रादुर्भाव होतो व पानावरील व खोडावरील तांबेरा, करपा, काणी इ. रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो त्याच्या नियंत्रणासाठी खाली दिलेल्या उपाय योजना कराव्यात.
खोडकिडा :
या किडीचे नियंत्रणासाठी उभ्या पिकातील किडग्रस्त झाडे आठवड्याचे अंतराने 2-3 वेळा मुळासकट उपटून नाश करावीत, हेक्टरी 2 किलो कार्बारील 50 टक्के पाण्यात मिसळणारी भुकटी 500 लिटर पाण्यात मिसळुन पहिली फवारणी 30 दिवसांनी करावी.
मावा :
या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर थायामिथोक्झाम (25 डब्ल्यू.जी.) 50 ग्रॅम किंवा सिटामिप्रीड 250 ग्रॅम/ हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी किंवा कार्बारील 10 टक्के भुकटी हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी. आवश्यकतेनुसार दुसरी फवारणी/धुरळणी 15 दिवसानी वरीलप्रमाणे करावी. जैविक उपायांमध्ये व्हर्टिसिलियम लेकॅनी किंवा मेटारायझियम निसोप्ली 250 ग्रॅम /हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळुन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारावे.
तुडतुडे :
या किडीचे नियंत्रणासाठी प्रादुर्भाव दिसुन आल्यावर थायामिथोक्झाम (25 डब्ल्यू.जी.) 50 ग्रॅम किंवा सिटामिप्रीड 250 ग्रॅम/ हेक्टरी 500 लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.
वाळवी :
वाळवीचा बंदोबस्त करण्यासाठी बांधावर असलेली वारूळे खणुन काढावीत व त्यातील राणीचा नाश करावा. वारुळ नष्ट केल्या नंतर जमीन सपाट करावी व मध्यभागी सुमारे 30 सेंमी खोलवर एक छिद्र करावे आणि त्यात क्लोरपायरीफॉस 20 टक्के प्रवाही हे किटकनाशक 15 मि.लि. 10 लिटर पाण्यात मिसळुन हे औषधाचे मिश्रण 50 लिटर एका वारुळासाठी या प्रमाणात वारुळात टाकावे किंवा क्विनॉलफॉस 5 % दाणेदार किंवा फोरेट 10 % दाणेदार किंवा कार्बोफ्युरॉन 3 % दाणेदार हेक्टरी 25 किलो जमिनीत टाकावे किंवा शेणखताबरोबर द्यावे. जमिनीमध्ये निंबोळी पेंड 200 किलो प्रति हेक्टरी टाकावी.
उंदीर :
उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी विषयुक्त आमिषांचा वापर करावा. हे आमिष तयार करण्यासाठी वीघटक सौम्य विष तसेच झिंक फॉसस्फाईड वापरावे. प्रथम 100 ग्रॅम पिठामध्ये 5 ग्रॅम तेल व 5 ग्रॅम गुळ मिसळून त्याच्या गोळ्या 2-3 दिवस उंदरांच्या येण्या-जाण्याचा मार्गावर ठेवावे, त्यामुळे उंदरांना चटक लागेल. त्यानंतर वरीलप्रमाणे गोळ्या कराव्यात त्यात 3 ग्रॅम झिंक फोस्फाईड टाकून, हातमोजे घालून किंवा काठीने मिश्रण करावे. पीठाच्या गोळ्या करून उंदरांच्या येण्या-जाण्याचा मार्गावर ठेवाव्या जेणेकरून ते खाऊन उंदीर मरतील.
तांबेरा व पानावरील करपा :
तांबेरा व करपा रोगापासून नुकसान टाळण्यासाठी प्रतिबंधक जातींचा वापर करावा. रासायनिक खतांची संतुलित मात्रा दयावी व नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते. तांबेरा व करपा रोगाची लागण दिसताच मॅन्कोझेब (डायथेन एम 45) हे बुरशीनाशक 1000 ग्रॅम/हेक्टरी, 500 मि.लि. प्रोपिकोनॅझोल/हेक्टरी 500-600 लिटर मिसळुन फवारणी करावी रोगाची तीव्रता लक्षात घेऊन 10 ते 15 दिवसांचे अंतराने फवारण्या कराव्यात. रासायनिक खतांची संतुलित मात्रा घ्यावी. नत्राचा शिफारशीपेक्षा अधिक वापर केल्यास गव्हाचे पीक तांबेरा रोगास जास्त प्रमाणात बळी पडते.
काजळी किंवा काणी :
या रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास व्हिटॅव्हॅक्स किंवा कार्बेन्डाझिम या बुरशीनाशकाची 2.5 ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बिज प्रक्रिया करावी, तसेच शेतातील रोगट झाडे मुळासकट उपटून नष्ट करावीत.
माहिती संकलित