ऊसावरील खोडकिडा
ही अळी भुरकट रंगाची असून उसाचे खोड पोखरते. त्यामुळे उसाचा शेंडा वाळून जातो. ऊस लागवडीच्या वेळी कार्बारिल 4 टक्के दाणेदार कीडनाशक जमिनीत मिसळावे व नंतर बेणे लावावे.
शेंडा पोखरणारी अळी
ही अळी पिवळसर असते. ती प्रथम पानाच्या मुख्य शिरात शिरते व शेंडयाकडे पोखरत जाते, त्यामुळे शेंडा मरतो व उसास अनेक फुटवे फुटतात.
व्यवस्थापन
क्विनॉलफॉस 25 ईसी 1000 मि. लि. 500 लि. पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. दोन आठवडड्याच्या अंतराने दुसरी व तिसरी फवारणी वरील प्रमाणे करावी.
पानावरील तुडतुडे (पायरीला)
अपूर्ण अवस्थेतील तुडतुडे रंगाने दुधी असून पूर्ण वाढलेले तुडतुडे पिवळसर असतात. यांचे डोके टोकदार असते. तुडतुडे पानांच्या खालील बाजूस राहून रस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडून सुकतात. यामुळे उसातील साखरेचे प्रमाण घटते. ऊसावरील कीड व्यवस्थापन
व्यवस्थापन
डायमेथोएट 30 ईसी 1000 मिलि किंवा मॅलाथियॉन 50 ईसी 850 मिलि किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 1200 मिलि किंवा फेनिट्रोथिऑन 50 ईसी 600 मिलि किंवा मोनोक्रोटोफॉस 36 ईसी 850 मिलि 1000 लिटर पाण्यात मिसळून दर हेक्टरी फवारावे. आवश्यक असल्यास 15 दिवसांनी वरीलप्रमाणे दुसरी फवारणी करावी. या किडीसाठी जरी किटकनाशके उपयुक्त असली तरी वाढलेल्या उसात शिरता येत नसल्यामुळे फवारणी अथवा धुरळणी करणे अशक्य होते. तेंव्हा इपिरीकेनीया (एपीपायरोप्स) मेलॅनोल्युका या परोपजीवी किटकाचे कोष सुमारे 5000 प्रति हे. किंवा 5 लाख अंडी पायरीलाग्रस्त शेतात सोडावेत.
देवी अथवा खवले कीड
ओळख व नुकसानीचा प्रकार
ही कीड फिक्कट काळसर असून उसाच्या कांडीवर पुंजक्यात आढळते. अपूर्ण व पूर्ण वाढलेली कीड कांड्यातील रस शोषून घेतात. त्यामुळे ऊस निस्तेज होतो. कांड्या बारीक बारीक पडतात. यामुळे उसातील साखरेचे प्रमाण घटते.
व्यवस्थापन
ऊस कापणीनंतर पाचट, धसकटे इत्यादी जाळून टाकावे. मॅलेथीऑन 50 ईसी 2000 मिलि किंवा डायमिथोएट 30 ईसी 2650 मिलि 1000 लिटर पाण्यात मिसळून फवारण्या कराव्यात. ऊस लावतेवेळी बेणे डायमिथोएट 30 ईसी 265 मिलि किंवा मॅलाथिऑन 50 ईसी 200 मिलि 100 लिटर पाण्यात मिसळून होणार्या द्रावणात बुडवून लावावे.
पांढरी माशी
बाल्यावस्थेत ही कीड सुरुवातीस पिवळसर व नंतर काळसर करडया रंगाची दिसते. तसेच तिच्या कडेला पांढर्या रंगाचे तंतू दिसतात. कीड पानाच्या मागील बाजूने स्थिर राहून रस शोषण करते.
व्यवस्थापन
या किडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खताच्या मात्रा शिफारशीप्रमाणेच द्याव्यात. नत्राच्या जास्तीचा वापर करुन नये. क्रायसोपरला कारनीया (क्रायसोपा) हया भक्षकाचे 1000 प्रौढ किंवा 2500 अळया प्रति हेक्टरी सोडाव्यात. अतिप्रादुर्भावग्रस्त शेतातील काळे कोष असलेली पाने काढून डायक्लोरोव्हास 76 ईसी हे कीटकनाशक 1100 मिलि किंवा क्विनॉलफॉस 25 ईसी 1600 मिलि किंवा डायमिथोऐट 30 ईसी 2650 मिलि किंवा ऑक्सिडिमेटॉन मिथाईल 25 ईसी 3200 मिलि किंवा मॅलेथिऑन 50 ईसी 2000 मिलि 1000 लिटर पाण्यातून 15 दिवसाचे अंतराने दोन वेळा फवारावे.
पांढरा लोकरी मावा
या किडीची पिल्ले पिवळसर किंवा हिरवट पिवळसर रंगाची असून तिसर्या अवस्थेनंतर त्यांच्या पाठीवर पांढरे लोकरीसारखे तंतू दिसतात. प्रौढ हे काळे व पारदर्शक पंखाच्या दोन जोड्या असलेले असतात. पिल्ले आणि प्रौढ मावा उसाच्या पानातील रस शोषण करतात. यामुळे पानांवर पिवळसर ठिंपके दिसतात. पाने कोरडे पडून वाळतात. ऊस कमकुवत होतो. वाढ खुंटते, उत्पन्नात व साखर उतार्यात घट येते. याशिवाय माव्याने बाहेर टाकलेल्या मधासारख्या विष्ठेमुळे पानावर काळी बुरशी वाढून पानाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो.
व्यवस्थापन
उसाची पट्टा अथवा रुंद सरी पध्दतीने लागण करावी. जेणे करुन पीक संरक्षण उपाययोजना करणे सोयीस्कर होईल. सुरुवातीस कमी प्रादुर्भाव असलेल्या शेतातील कीडग्रस्त पाने तोडून जाळून टाकावीत. कीडग्रस्त शेतातील पाने दुसर्या शेतात नेऊ नयेत. कीडग्रस्त बेणे वापरु नये. फवारणीनंतर 10 ते 15 दिवस ऊस किंवा उसाचे वाढे जनावरांना खाऊ घालू नये.
कोनोबाथ्रा अफिडोव्होरा या परभक्षी मित्र किटकांची 2500 अंडी किंवा 1000 अळ्या प्रति हेक्टर सोडाव्यात. क्रायसोपा या परभक्षी मित्र किफ्काची 2500 अंडी किंवा अळया प्रती हेक्टरी सोडाव्यात. जैविक मित्र कीटक शेतात सोडल्यावर किटकनाशकांची फवारणी 3 ते 4 आठवडे करु नये.
फोरेट हे कीटकनाशक ऊस तोडण्यापूर्वी तीन महिने वापरु नये. शेतात किटकनाशकांचा वापर करतांना हातमोजे व चेहर्यावर मास्कचा वापर करावा.
- पांढरा लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव आढळल्यास ऑक्सिडिमेटॉन मिथाईल 25 टक्के प्रवाही 600 मिलि 400 लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस) 1050 मिलि 700 लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस), 1500 मिलि 1000 लिफ्र पाण्यामध्ये (मोठा ऊस) किंवा डायमिथोएट 30 टक्के प्रवाही 600 मिलि 400 लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस), 1050 मिलि 700 लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस) 1500 मिलि 1000 लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस) किंवा मॅलेथिऑन 50 टक्के प्रवाही 800 मिलि 400 लिटर पाण्यामध्ये (लहान ऊस) 1400 मिलि 700 लिटर पाण्यामध्ये (मध्यम ऊस) 2000 मिलि 1000 लिटर पाण्यामध्ये (मोठा ऊस) मिसळून फवारणी करावी.
श्रोत – समाजमाध्यम