महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण, उद्योग क्षेत्र अशा विविध ठिकाणी काका-पुतण्याच्या जोड्या सर्वांनाच माहित आहे. अशीच एक आगळीवेगळी काका-पुतण्याची जोडी शेतीच्या क्षेत्रातही कार्यरत आहे. त्यांनी आपल्या जिद्दी आणि कष्टाने दुग्धव्यवसायात प्रगती केली असून वार्षिक १० लाख रु नफा ते मिळवीत आहेत. आजच्या घडीला भाऊ-भाऊचे, मुलगा–वडिलांचे जमत नाही असे चित्र समाजात ठिकठिकाणी पहावयास मिळते. पण काका-पुताण्यातील प्रेम, जिव्हाळा त्यातून दुग्ध व्यवसायाची संकल्पना यशस्वीरित्या पूर्णत्वास नेऊन नात्यातील एक नवा आदर्श अण्णासाहेब रामचंद्र पाटील व पुतण्या लखन अमर पाटील यांनी समाजाला दिला आहे.
अण्णासाहेब रामचंद्र पाटील हे कवठेमहाकाळ तालुक्यातील बोरगांव (आमराईनगर) येथील रहिवाशी आहेत. तालुक्यापासून १२ किमी अंतरावर बोरगांव हे गांव वसले आहे. पूर्वीच्या काळी या भागाला दुष्काळाचा सामना करावा लागत होता, पण जलसिंचानाच्या सोयी झाल्याने गावाचा दुष्काळ पूर्ण संपला आहे. त्यामुळे आता गावकरी भाजीपाला, दुग्धव्यवसाय, द्राक्ष, ऊस यासारखी नगदी पिके घेतात. त्याचबरोबर गावातील तरुण वर्गाचा व्यवसायाकडेही कल आहे. येथीलच अण्णासाहेब पाटील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित १.५ एकर जमीन आहे. संपूर्ण जमीन ही खडकाळ प्रकारची आहे. त्यामुळे पिकण्यास कमी उपजाऊ आहे. घराच्या नाजूक परिस्थितीमुळे पाटील यांचे शिक्षण हे ८ वी पर्यंत झाले आहे. शाळा सोडल्यानंतर काही दिवस दुसऱ्यांच्या शेतात काम केले. नंतर काही दिवस मुंबईमध्ये तीन हजार रु पगारावर रेशनिंगच्या दुकानावर काम केले. दरम्यान गावाकडे एक कंपनी सुरु होणार असल्याची माहिती मिळाली, त्यामुळे गावाकडे येऊन तेथे काम सुरु केले. गावात असल्याने घरची शेती व कंपनी असे दोनही कामे करणे शक्य झाले.
व्यावसायिक दूरदृष्टी असलेला पुतण्या
अण्णासाहेब पाटील यांच्या भावाचे आकस्मित निधन झाले, तेव्हा पुतण्या लखन हा अवघा ७ वर्षाचा होता. त्यामुळे घरी पाहणारे कुणीही नव्हते. दुसरे कुणाचे आर्थिक पाठबळही नव्हते. संपूर्ण परिवाराची जबाबदारी अण्णासाहेब यांच्यावर आली. घरी मोठा परिवार होता आणि कमाविणारा एकाच जण होता. त्यामुळे पुतण्या लखन यानेही १० वी पासून शिक्षण सोडले. ज्यावेळी लखन हाताखाली आला त्यावेळी त्यालाही काकांनी कंपनीमध्ये कामासाठी विचारणा केली. परंतु लखन हा व्यावसायिक दृष्टिकोन असलेला जिद्दी मुलगा होता त्यामुळे त्याला दुसऱ्याच्या हाताखाली काम करणे आवडत नव्हते. पुतण्याला कंपनीत कामाला लावणे शक्य झाले नाही. त्यामुळे काकांनी त्याला स्वतःचा मार्ग निवडण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले. केला तर स्वतःचा काहीतरी व्यवसायच करायचा ही जिद्द लखनने कायम ठेवली.
२०१७ ला पाटील डेअरी फार्मची उभारणी
विविध व्यवसायाची चाचपणी करत असतांना त्याला आवडता असा पशुपालनाचा छंद हाच व्यवसाय म्हणून केला तर चांगले अर्थाजन करता येईल असा आशेचा किरण दिसला. लखनला सुरुवातीपासून गाई, म्हशी, बैल सांभाळण्याची खूप आवड होती. त्यामुळे दुग्धव्यवसाय हाच आपल्याला विकासाकडे घेऊन जाणार याची त्याला कल्पना होती. गावातील मोठ-मोठाले गोठे पाहून आपलाही असाच गोठा असावा ही जिद्द त्यांच्या मनात निर्माण झाली. कितीही कष्ट करावे लागले तरी आपला स्वतःचा गायीचा गोठा उभारायचा निर्णय पुतण्याने काकांच्या समोर ठेवला. पूर्वीपेक्षा आता स्थिती चांगली होती लखन कामासाठी हाताशी होता त्यामुळे अण्णासाहेब यांनाही तो निर्णय आवडला आणि त्यांनी त्यादृष्टीने तयारी सुरु केली.
बँका व फायनान्स कंपन्यांनी नाकारले कर्ज
पाटील यांची शेती कमी असल्याने अल्पभूधारक म्हणून त्यांना कोणतीही बँक व फायनान्स कंपनी यांनी कर्ज देण्यास सहमती दर्शविली नाही. दुधव्यवसाय सुरु करायचा म्हणजे भांडवल तर हवेच आणि बँका तर कर्ज देण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे घरातील दागिने गहाण ठेऊन शेडच्या उभारणीसाठी भांडवल उभारले. त्यामधून १३० फुट लांब व १६ फुट रुंद अश्या पद्धतीचा सुसज्ज असा गोठा तयार केला.
सुरुवातीला ३ गायींपासून व्यवसायाची सुरुवात केली. गुरांचे आजार, त्यांना लागणारे खाद्य यांचा अभ्यास केला. अशा विविध बारीकसारीक बाबींचा अभ्यास केला. त्यांनतर डेअरी उत्पादकांकडून पैसे घेऊन गायींची संख्या अजून वाढविली. सध्या त्यांच्याकडे एकूण १९ गाई आहेत. यातही दुध देणाऱ्या पशूंची सांख्य अधिक आहे.
गोठ्यातील दिनक्रम
काका-पुतण्याच्या दिवसाची सुरुवात पाहटे ४.०० वाजता होते. गोठ्यातील शेण काढणे, वैरण घालणे, ही कामे केली जातात. अण्णासाहेब पाटील यांची पत्नी सरिता व मुलगा हर्षल या सर्वांचाच गोठ्यातील कामात सक्रीय सहभाग असतो. आजही पाटील कंपनीत काम करतात. त्यामुळे ते जेव्हा कंपनीत असतात त्यावेळी पुतण्या लखन व पत्नी सरिता सर्व गोठ्याची व्यवस्था सांभाळतात. वैरण कापण्यासाठी कडबाकुट्टी मशीन आहे. गायींचे आजारपण व इतर देखभाल ही कामे सरिता बघतात. सकाळी ६.३० वाजता तर सायंकाळी ६.३० वाजता दुध काढले जाते. दिवसातून गायींना ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुतले जाते. गायींचा गोठा हा गावापासून २ किमीवर आहे. त्यामुळे तेथील सुरक्षेच्या दृष्टीने प्रिन्स व गोपी नावाचे दोन श्वान त्यांनी पाळले आहेत
अर्थार्जन
साधारण दिवसाला २०० लिटरच्या सरासरीने १९ दुधाळ गायींपासून दुध मिळते. दुधाचा दर हा ३० रु प्रतिलिटर मिळतो. याप्रमाणे महिन्याला १ लाख ८० हजार रु चे दुध विक्री होते. काही वेळा गायींचा भाकड हा जास्त असल्यास दुध कमी जास्त प्रमाणात मिळते. वर्षभराचे शेणखत ३५ ट्रॉली मिळते. याचे पैसे हे बोनसच्या स्वरुपात शिल्लक राहतात. सकाळ संध्याकाळ गायींना सरकी ढेप, गोबी, मका चुणी अश्या विविध प्रकारचे विविध खाद्य दिले जाते. गुरांचा चारा, औषध व इतर किरकोळ खर्च जाता निव्वळ १० लाख रु वार्षिक नफा या व्यवसायातून मिळतो.
प्रतिक्रिया
कमीतकमी २ गाईपासून सुरुवात करावी
दुग्ध व्यवसायाच्या बाबतीत लखन यांना विचारले असता ते सांगतात. युवा शेतकऱ्यांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसायात यावे. सुरुवात करतांना फार मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन सुरुवात न करता फक्त कमीतकमी २ गाईपासून सुरुवात करावी. जेणेकरून या व्यवसायातील बारकावे आणि अडचणी लक्षात येतील. कोणत्याही कामाची लाज न बाळगता कष्ट केल्यास नक्कीच यश मिळते. या व्यवसायात मिळलेला अनुभव आणि भविष्यातील संधी पाहता आम्हाला आत ५० गायींचा गोठा वाढविण्याचा विचार आहे.
लखन पाटील