“उन्हाळी मुगाची स्वच्छ सूर्यप्रकाश व उष्ण हवामान यामुळे उन्हाळ्यात मुगाचे पिक चांगले पोसते व भरपूर उत्पादन मिळते. शिवाय या पिकावर उन्हाळ्यात रोगांचे व किडींचा प्रादुर्भाव अत्यल्प असतो. सिंचनाची सुविधा असल्यास उन्हाळ्यात मुगाचे चांगले उत्पन्न मिळू शकते.
मुगाच्या शेंगा साधारण ६० ते ६५ दिवसांत तोडणीस येतात. मूग हे शेंगवर्गीय द्विदल पीक असल्याने त्याच्या मुळावर गाठी असतात. या गाठीमध्ये ‘रायझोबियम’ हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन ते जमिनीत स्थिर करीत असतात व जमिनीतील नत्राचा साठा वाढवतात. त्यामुळे जमिनीचा कस वाढवण्यासाठी हे पीक फायदेशीर ठरते. काढणीनंतर त्याचा जनावरांना चारा मिळतो किंवा शेंगा तोडणीनंतर ते जमिनीत बेवड म्हणून गाडल्यास जमिनीचा कस सुधारतो व पुढच्या पिकाला त्याचा लाभ होतो. त्यामुळे रब्बी पिकांच्या काढणीनंतर उन्हाळी मूग लागवड किफायतशीर ठरते.
• हवामान :
मूग विशेषतः खरिपात घेतला जातो; परंतु सिंचन सुविधा व सुधारित जाती यामुळे उन्हाळ्यातही वैशाखी मूग म्हणून लागवड केली जाते. हे पीक उष्ण हवामानात चांगले येते. साधारणपणे २१ ते ३५ अंश से. तापमानात मुगाची चांगली वाढ होते. ६०० ते ७०० मि.लि. वार्षिक पाऊसमान असलेल्या भागात याचे उत्पादन भरपूर मिळते. अति कडाक्याची थंडी मात्र पिकास मानवत नाही.
• जमीन :
मध्यम ते भारी जमिनीत मूग चांगला पिकतो; मात्र जमीन चांगली निचऱ्याची असावी. जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण चांगले असावे.
• पूर्वमशागत :
मूग लागवडीसाठी निवडलेली जमीन चांगली नांगरून घ्यावी. नांगरटीपूर्वी एकरी चार-पाच गाड्या शेणखत अथवा कुजलेले कंपोस्ट मातीत मिसळावे. दोन वेळा उभ्या-आडव्या कुळवण्या करून रान चांगले भुसभुशीत करावे. पूर्वीच्या पिकाची धसकटे, काडी-कचरा वेचून रान स्वच्छ ठेवावे. आवश्यकता असल्यास ढेकळे फोडून घ्यावीत. चांगली मशागत करून रान पेरणीसाठी तयार करावे.
• जाती :
वैभव, फुले एम. २, एस. ८, बी.एम.४, पी.डी.एम. १, पुसा ९५३१ किंवा पुसा वैशाखी
• पेरणीची वेळ व पद्धती :
थंडीचा अंमल कमी झाल्यावर उन्हाळी मूग पेरणी फेब्रुवारीअखेर ते मार्च महिन्याचा पहिला पंधरवडा या कालावधीत करावी. जास्त उशिरा पेरणी केल्यास पीक जून-जुलैच्या भर पावसात काढणीस येते. त्यामुळे शेंगाचे नुकसान होण्याची शक्यता असते. दोन ओळीतील अंतर ३० सें. मी. व दोन रोपांतील अंतर १० सें. मी. अंतर ठेवून पाभरीने मूग पेरावा. एकरी पाच ते सहा किलो बियाणे पुरेसे होते. पेरणी केल्यावर पाणी व्यवस्थित देण्यासाठी चार-पाच मीटर रुंदीचे सारे ओढून घ्यावेत.
• बीज प्रक्रिया :
मूग पिक विशेषतः मूळकुजव्या रोगास बळी पडते. अशा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता पेरणीपूर्वी बियाण्यास बीजप्रक्रिया करणे महत्त्वाचे असते. ट्रायकोडर्मा ४ ग्रॅम किंवा थायरम ३ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळावे. बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर जिवाणू संवर्धन खतांची बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी रायझोबियम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धक २५ ग्रॅम प्रति किलो बी या प्रमाणात बियाण्यास चोळून बियाणे सावलीत वाळवावे व लगेच पेरणीस वापरावे.
• आंतरमशागत :
पेरणीपासून ३० ते ३५ दिवसांपर्यंत शेत तणविरहीत ठेवावे. यासाठी पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी हलकीशी कोळपणी करावी. त्यानंतर गरज भासल्यास १० ते १२ दिवसांनी परत एखादी खुरपणी करावे.
• अन्नद्रव्य व्यवस्थापन :
पूर्वमशागतीच्या वेळी पुरेसे कंपोस्ट खत द्यावे. पेरणीच्या वेळी माती परीक्षणानुसार एकरी ८ किलो नत्र (१७.५ किलो युरिया) व १६ किलो स्फुरद (१०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट) द्यावे. पीक फुलोरा अवस्थेत असताना २ टक्के युरिया (२० ग्रॅम प्रति लिटर पाणी) मिसळून फवारावे. तसेच मुगाच्या शेंगा भरत असताना २ टक्के डीएपी (२० ग्रॅम डीएपी प्रति लिटर पाणी) मिसळून फवारावे.
• पाणी व्यवस्थापन :
पेरणीपूर्वी रान ओले करून वाफश्यावर आल्यानंतर पेरणी करावी. उन्हाळी मुगास पेरणीनंतर प्रथम तीन ते चार दिवसांनी हलकेसे पाणी द्यावे. पहिल्या हलक्याशा पाण्यानंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पिकाच्या गरजेनुसार आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. एकूण पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या पिकाच्या संपूर्ण कालावधीत द्याव्यात. तुषार सिंचनाचा वापर करून मूग भिजविल्यास अधिकच फायदा होतो. विशेषतः पीक फुलोऱ्यात असताना व शेंगा तयार होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये. या काळात जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक असते.
• पीक संरक्षण :
मुगावर उन्हाळ्यात किडींचा प्रादुर्भाव कमी पडत असला, तरी प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पाने खाणारी व शेंगा पोखरणारी अळी व भुंगेरे दिसून आल्यास त्याकरिता डायमेथोएट (३० इसी) २ मि.लि. अथवा क्विनॉलफॉस (२५ इसी) २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भुरी व करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव मुगावर येऊ शकतो. रोग नियंत्रणासाठी २.५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा १ ग्रॅम कार्बेंडाझिम प्रति लिटर पाण्यातून फवारावे. आवश्यकतेनुसार कीटकनाशक व बुरशीनाशकाच्या आलटून-पालटून एक-दोन फवारण्या कराव्यात.
• काढणी :
उन्हाळी मूग ६० ते ६५ दिवसांत काढणीस येतो. जवळजवळ ७० ते ७५ टक्के शेंगा तयार होऊन वाळल्यावर पहिली तोडणी करावी. तयार झालेल्या शेंगा दोन ते तीन तोड्यांमध्ये तोडून घ्याव्यात. तोडलेल्या शेंगा वाळवून व काठीने झोडपून मळणी करावी व नंतर उफणणी करून घ्यावी. तयार झालेले धान्य नीट वाळवून मगच साठवण करावी. वरीलप्रमाणे सुधारित पद्धतीने उन्हाळी मुगाची लागवड करून जातीपरत्वे ४ ते ५ क्विंटल प्रति एकरी मूग उत्पादन मिळू शकते.उन्हाळी मुगाचउन्हाळी मुगाचीउन्हाळी मुगाची
सौजन्य- कृषी विभाग महाराष्ट्र शासन