रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांपैकी हरभरा हे एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात खरीपात प्रमुख पीक म्हणून शेतकऱ्यांची हरभरा या पिकाला जास्त पसंती आहे. मागील वर्षी (२०१८-१९ ) १९११५६८ हेक्टर वर असेलला हरभरा पेरा यावर्षी(२०१९-२०) २९०२०३० हेक्टर पर्यंत आहे. या वाढलेल्या क्षेत्रावरून खरीपातील या पिकाचे महत्व लक्षात येईल. शेतकऱ्यांच्या अर्थकारणात महत्वपूर्ण भूमिका असणाऱ्या या पिकाला शेतकरी अनियंत्रित पाणी पुरवठा करतात आणि अतिरिक्त पाण्यामुळे पिकाचे नुकसान करून घेतात. या पिकाला असुंतुलीत पाणी दिल्यास पीक उभळण्याचा धोका असतो, त्यामुळे पारंपारिक पद्धतीमध्ये थोडासा बदल करुन आधुनिक सिंचनाची जोड देऊन व सुधारित वाणांचा वापर केल्यास या पिकापासून कोरडवाहु क्षेत्रातसुद्धा चांगले उत्पादन मिळते.
पाणी व्यवस्थापन:
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबाधंणी करताना दोन साऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुध्दा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीकरिता पाण्याच्या दोनच पाळया पुरेशा होतात त्याकरिता 30-35 दिवसांनी पहिले व 60-65 दिवसांनी दुसरे पाणी दयावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेंमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 से.मी) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पीक उभळण्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळयांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.
तुषार सिंचन: हरभरा पिकास वरदान
हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी
दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पिक
पाण्यास अतिशय संवदेनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि
त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन अतिशय उत्कृष्ट
पध्दत आहे. तुषार सिंचन पध्दतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला
पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पध्दतीत कमी
होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पध्दतीत पिकास अनेकदा
प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक
उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मुळकुज
रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)