पुणे ः शेतीमध्ये दिवसेंदिवस होणारे नवनवीन बदल शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत. या बदलाचाच एक भाग असलेला मल्चिंग पेपर आता कांदा उत्पादनातही प्रभावी ठरताना दिसत आहे. सर्वसाधारणपणे पारंपरिकरित्या लागवड केलेल्या कांद्यांचे उत्पादन आणि मल्चिंगचा वापर करुन घेतलेले उत्पादन पाहता, मल्चिंगच्या वापरामुळे कांद्यांचे उत्पादन वाढत असल्याचे दिसून आले आहे. शिवाय एकसारखा कांदा देखील उत्पादीत झालेला दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादनात मल्चिंग पेपरचा वापर करणे फायदेशीर ठरत आहे.
मल्चिंगसह ठिबकचा वापर
कांदा लागवड करण्यासाठी मजुरांची खूप आवश्यकता भासते. सध्या विविध कारणांमुळे मजुर मिळणे दुरापास्त होत आहे. त्यामुळे शेतकर्यांकडून नवनवीन पद्धतीचा अवलंब केला जात असल्याचे दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने कांदा लागवडीसाठी मजुरांची चणचण भासत असल्याने बर्याच शेतकर्यांनी आता कांदा पेरणी यंत्राचा वापर सुरु केले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात तर याहून पुढे जात, काही शेतकर्यांनी चक्क मल्चिंग पेपरचा वापर करुन कांदा लागवडीचा प्रयोग यशस्वी केल्याचे दिसून येत आहे. मल्चिंग पेपर व ठिबक सिंचनाचा आधार घेत, आता या भागात शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाकडे कल वाढला आहे. सद्यःस्थितीत सुमारे चारशे एकरवर मल्चिंग पेपर व ठिबकद्वारे कांदा लागवड करण्यात आली आहे. निफाड तालुका हा द्राक्षांचे उत्पादन घेणारा तालुका असला तरी आता कांदा लागवड देखील या तालुक्यात वाढली आहे. कांदा पिकाचे व्यवस्थित नियोजन व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकरी निर्यातक्षम कांदा उत्पादन करु लागले आहेत. द्राक्ष बागांना हवामानातील बदलाचा फटका बसत असल्याने व गेल्या काही वर्षापासून द्राक्ष उत्पादनातून हवे तेवढे उत्पन्न हाती लागत नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी द्राक्षबागा तोडून कांद्याची लागवड केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून बाजारात कांद्यांना चांगला भाव मिळत असल्याने शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत अनेकांनी निर्यातक्षम कांदा उत्पादीत केला आहे. या भागातील सुमारे तीन हजार हेक्टर कांद्यापैकी चारशे एकरवर मल्चिंग पेपर, ठिबकद्वारे गादीवाफे करुन कांद्याची लागवड केलेली दिसून येत आहे.
मल्चिंग पेपर वापराचे फायदे
मल्चिंग पेपरवर कांद्याची लागवड केली तर कांद्याचा आकार हा सारखा होतो. मल्चिंग पेपरवर सारख्या अंतरावर छिद्रे असल्याने दोन रोपांमधील अंतर देखील एक सारखे असते. त्यामुळे कांद्याची वाढ एकसारखी व चांगल्या पद्धतीने होते. यामध्ये ठिबकचा वापर केल्याने पाणी व्यवस्थापन व्यवस्थित करता येते. मल्चिंग पेपरवर उत्पादित झालेला कांदा हा एकसारखा उत्पादीत होतो. शिवाय त्याचा रंगही चांगला असतो. ज्यामुळे बाजारात अशा कांद्याला चांगला भाव मिळतो. ठिबकचा वापर केल्याने पाण्याची बचत होते तसेच मल्चिंग पेपरमुळे तणांची वाढ जास्त न होता, ती नियंत्रणात राहते. ज्यामुळे खुरपणी व तणनाशक फवारणीचा खर्च देखील वाचतो. पारंपारिक पद्धतीने कांदा लागवडीच्या माध्यमातून एकरी नऊ टनांपर्यंत उत्पादन मिळते. परंतु मल्चिंग पेपरचा वापर केल्याने एकरी तीन ते चार टनांची वाढ उत्पादनात होऊ शकते. मल्चिंग पेपरसाठी शेतकर्यांना आर्थिक झळ बसत असली तरी त्याचे फायदे लक्षात घेता, अनेकांनी आता मल्चिंग पेपरचा वापर करुन कांदा उत्पादन घेण्यावर भर दिलेला दिसून येत आहे.