नवी दिल्ली : आता लवकरच देशातील सर्व वाहने इथेनॉलवर (ethanol) धावू शकतील, त्यासाठी भविष्यात आणखी इथेनॉल पंप बसवण्यात येणार आहेत, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, बायो इथेनॉलपेक्षा पेट्रोलची किंमत जास्त आहे. पेट्रोलमुळे हवेचे प्रदूषणही जास्त होते. त्यामुळे इथेनॉलचा वापर करून प्रदूषण कमी करण्यासोबतच लोकांचे पैसे वाचवता येणार आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही माहिती दिली.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की, ऑटो रिक्षापासून ते हाय-एंड कारपर्यंत सर्व वाहने इथेनॉलवर चालण्यात येतील. देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता वाढवण्याची गरज आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा नफा वाढवण्याबरोबरच इंधनाचा पुरवठा वाढविण्यासाठी पारंपरिक पिकांऐवजी इथेनॉल उत्पादनाकडे वळण्याची आज गरज असल्याचेही ते म्हणाले.
इंधनाच्या आयातीवर दरवर्षी 8 लाख कोटी खर्च
पेट्रोल आणि डिझेल या इंधनाच्या आयातीवर देश दरवर्षी जवळपास 8 लाख कोटी रुपये खर्च करतो, यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भर दिला. तसेच, फ्लेक्स इंधन मोठ्या प्रमाणात वापरल्यास हा आकडा कमी होऊ शकतो. त्यामुळे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशात इथेनॉलचे उत्पादन वाढवावे लागेल, असे त्यांनी सांगितले.
कंपन्यांनी फ्लेक्स-इंधन इंजिनाची तयारी सुरू केली
फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करण्यास सुरुवात गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कार निर्मात्यांना 6 महिन्यांत वाहनांमध्ये फ्लेक्सिबल-इंधन इंजिन असलेली वाहने बनवण्याचा सल्ला दिला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, केंद्र सरकार हरित आणि पर्यायी इंधनाच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी काम करत आहे, ज्यामध्ये कंपन्यांनाही पुढे यावे लागेल. टीव्हीएस मोटर्स (TVS motors) आणि बजाज ऑटो (Bajaj) सारख्या ऑटो कंपन्यांनी त्यांच्या चारचाकी आणि तीन चाकी वाहनांसाठी फ्लेक्स-इंधन इंजिन तयार करण्यास सुरुवात केली आहे.
काय आहे फ्लेक्स इंधन..?
फ्लेक्स-इंधन हे पर्यायी इंधन आहे, जे पेट्रोलमध्ये मिथेनॉल किंवा इथेनॉल मिसळून तयार केले जाते. फ्लेक्स-इंधनला त्याच्या जैवइंधनाच्या स्वरूपामुळे पेट्रोलपेक्षा कमी प्रदूषक असल्याचा दावा केला जातो. फ्लेक्स-इंधन इंजिन पेट्रोल आणि जैवइंधन या दोन्हीवरही चालू शकतात.